Dainik Maval News : मावळ तालुक्यातील विविध विकासकामांना गती देण्यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी गुरुवारी (दि.13) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे आयुक्त योगेश म्हसे यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत मावळ तालुक्यातील पर्यटन विकास, क्रीडा संकुल, वाहतूक, नदी सुधार योजना आणि अन्य पायाभूत सुविधा विकासासंदर्भात चर्चा करण्यात आली.
पर्यटन विकासासाठी निधीची तरतूद
मावळ तालुका हा निसर्गरम्य स्थळांसाठी प्रसिद्ध असून, येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. त्यामुळे किल्ले तिकोना, तुंग, लोहगड आणि राजमाची या ऐतिहासिक किल्ल्यांपर्यंत जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांचे सुधारणा करण्यासाठी आणि पर्यटकांसाठी आवश्यक सोयीसुविधा उभारण्यासाठी पीएमआरडीएच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला.
अद्ययावत क्रीडा संकुल उभारणार
मावळ तालुक्यातील युवक-युवतींना क्रीडा क्षेत्रात उत्तम सुविधा मिळाव्यात म्हणून तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्वसमावेशक आणि अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्याची मागणी करण्यात आली. यासंदर्भात आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत जागा उपलब्धतेनुसार तात्काळ काम सुरू करण्याचे आश्वासन दिले.
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जंक्शन सुधारणा
जुना पुणे-मुंबई महामार्ग हा प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, येथे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे देहूरोड सेंट्रल चौक, सोमाटणे-शिरगाव चौक आणि कार्ला फाटा येथे जंक्शन सुधारणा करण्यात येणार असून, यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.
नदी सुधार योजनेला गती
इंद्रायणी आणि पवना नदी स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी विशेष उपाययोजना हाती घेतल्या जाणार आहेत. नदीलगतच्या गावांमध्ये मलनिस्सारण केंद्र उभारणी, नदी घाटांचे नूतनीकरण आणि स्वच्छता उपक्रम राबविले जाणार आहेत.
अग्निशमन केंद्र, तलाव सुशोभीकरण आणि कुस्ती आखाड्यांसाठी निधी
मावळ तालुक्यातील सुरक्षाविषयक गरजा लक्षात घेऊन तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी अग्निशमन केंद्र उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच पेशवेकालीन तलावांचे सुशोभीकरण आणि कुस्ती आखाड्यांच्या विकासासाठीही विशेष तरतूद करण्यात येणार आहे.
या बैठकीला पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे यांच्यासोबत अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, मुख्य अभियंता अशोक भालकर, रिनाज पठाण, अधीक्षक अभियंता बागडे, नगर रचनाकार सुनील मरळे, श्वेता पवार, कार्यकारी अभियंता वसंत नाईक, सुयश शेवाळे, शुभम वाकचौरे आदी अधिकारी उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक : छाननीत पाच अर्ज बाद, 195 अर्ज वैध
– मावळात जेई लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्धार ; 1 वर्षे ते 15 वर्षे वयोगटातील बालकांचे केले जाणार लसीकरण । Maval News
– मावळातील पुणे ग्रामीण पोलीस दलाची ‘ती’ चार ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयास जोडण्यास गृह विभागाचा नकार ? । Maval News