Dainik Maval News : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ बाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जांची पडताळणी करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर अनेक महिलांच्या मनात धास्ती असून आत्तापर्यंत राज्यातील हजारो महिलांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज मागे घेतल्याचे समोर आले आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत शासनाने पात्र महिलांना दीड हजार रुपये महिना खात्यात टाकण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण राज्यात या योजनेच्या जवळपास 2 कोटी 30 लाख महिला पात्र लाभार्थी आहेत. मात्र, यापैकी बऱ्याच पात्र महिला या सधन कुटुंबातील असूनही त्यांनी योजनेचा लाभ घेतला असल्याचे समोर आले. त्यामुळे अशा लाभार्थ्यांची शासनाने पडताळणी सुरु केली आहे. शासनाच्या या निर्णयाची लाभार्थी महिलांना आता धास्ती वाटू लागली आहे. त्यामुळे अनेक महिलांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको असा सांगणारा अर्ज सादर केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकार
चंद्रपूर जिल्ह्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी होणार असल्याचे समोर आल्यानंतर अर्ज पडताळणीच्या धास्तीने चंद्रपूरमधील महिलांनीच हे पैसे नाकारण्यास सुरूवात केली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 21 बहिणींनी योजनेचा लाभ नको असे सांगत जिल्हा महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज केला आहे. हे अर्ज मंत्रालयात डीबीटी बंद करण्यासाठी पाठविले आहेत.
राज्यातही हजारो महिलांची माघार
‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारकडून काही निकष जाहीर करण्यात आले होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांची पडताळणी केली जाणार असल्याचे सांगण्यात येत होतं. मात्र, आता पडताळणी होण्याआधीच हजारो महिलांनी अर्ज माघारी घेण्यास सुरुवात केली आहे. या योजनेच्या अर्जांची पडताळणी होण्याआधीच राज्यातील सुमारे 4 हजार महिलांनी आपला अर्ज या योजनेतून मागे घेतला असल्याचे समजते.
गुन्हा दाखल होण्याची भीती
पैसे परत करावे लागतील, या भीतीने हजारो लाडक्या बहिणींनी अर्ज मागे घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपात्र असूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याने सरकार आपल्यावर कारवाई करेल, अशी भीती महिलांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी केलेले अर्ज मागे घेण्यास सुरूवात केली आहे. चंद्रपूरसह राज्यातील इतर जिल्ह्यातूनही महिलांनी असे अर्ज केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. महिलांनी जिल्हा महिला व बालकल्याण विभागाकडे हे अर्ज केले आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– दुचाकी, चारचाकी वाहनांचे पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून फेब्रुवारीचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ; 1 हजार 299 कोटींच्या प्रारूप आराखड्यास व 753 कोटींच्या अतिरिक्त मागणीस मान्यता
– तळेगाव शहर हादरले ! भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी युवकाची हत्या । Murder in Talegaon Dabhade City