Dainik Maval News : मुंबई शहर फक्त महाराष्ट्राचेच नाही तर देशाच्या अर्थगाड्याचे चाक आहे. कोट्यवधी नागरिकांच्या स्वप्नांना कवेत घेऊन धावणाऱ्या या मुंबईची ओळख स्वप्ननगरी अशी आहे. मुंबई शहराच्या विकासाचा इतिहास पाहिल्यास एक गोष्ट प्रकर्षाने दिसून येते ती म्हणजे, जेव्हा जेव्हा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी किंवा सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे राहिलेत, तेव्हा तेव्हा मुंबई ही सर्वाधिक वेगाने धावली अर्थात मुंबईच्या विकासाचा वारू जोरात धावत होता. परंतु, मुंबईच्या विकासाचा हाच वारू रोखण्यासाठीचा कुटील प्रयत्न आता होत असल्याची टीका होत असून याअनुषंगाने काही मुद्द्यांवर प्रकाश टाकणे आवश्यक आहे.
फडणवीसांच्या काळात मुंबईत पायाभूत सुविधांचे सुवर्णयुग –
२०१४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असताना मुंबई शहराने खऱ्या अर्थाने आधुनिकतेची कास धरली. दशकानुदशके कागदावर असलेले प्रकल्प जमिनीवर अवतरले. मुंबई मेट्रोचे जाळे विणणे असो की कोस्टल रोडची आखणी असो, अथवा ट्रान्स हार्बर लिंक (अटल सेतू) ची पायाभरणी असो, या सर्व कामांना फडणवीस यांच्या सरकारने गती दिली होती.
ठाकरेंच्या काळात अनेक प्रकल्पांना स्थगिती –
दरम्यान २०१९ मध्ये शिवसेना – भाजपाची युती तुटली आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याशी घरोबा केला. यावेळी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारने देवेंद्र फडणवीस यांनी रुळावर आणलेली मुंबईच्या विकासाची गाडी रुळावरून खाली उतरवली. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईसाठी सुरू केलेले प्रकल्प रोखण्यात आले. मेट्रो-३ चे कारशेड (आरे) थांबवले, या एका निर्णयामुळे सदर प्रकल्पाचा खर्च तब्बल १० हजार कोटींनी वाढला आणि मुंबईकरांचा हक्काचा प्रवास चार वर्षे लांबणीवर पडला. यासोबतच जलयुक्त शिवारपासून ते मेट्रोपर्यंत प्रत्येक लोककल्याणकारी कामाला स्थगिती देणे, हेच तत्कालीन मविआ सरकारचे जणू धोरण बनले होते.
लॉकडाऊन काळातील गंभीर आरोप –
कोरोना महामारीच्या काळात जेव्हा सामान्य मुंबईकर हतबल बनला होता, तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये अनेक घोटाळे झाल्याचे आरोप झाले. ‘खिचडी’पासून ते ‘बॉडी बॅग’पर्यंतच्या घोटाळ्यांचे गंभीर आरोप याच काळात झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांचे पुनरागमन अन् विकासाला गती –
दरम्यान २०२२ मध्ये राज्यात महायुती सरकार आले आणि मुंबई शहराने जणू सुटकेचा निश्वास टाकला. रखडलेले सर्व अडथळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या काही दिवसांत दूर केले. त्यामध्ये अनेक प्रोजेक्ट आपल्याला पाहायला मिळतात.
१. अटल सेतू – महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईकरांना मोठी भेट मिळाली. ती म्हणजे, देशातील सर्वात लांब सागरी सेतू विक्रमी वेळेत पूर्ण करून जनतेसाठी खुला केला.
२. कोस्टल रोड – दक्षिण मुंबई ते वरळी हा प्रवास आता अवघ्या काही मिनिटांवर आला आहे, हे स्वप्नवत काम देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखालील महायुती सरकारच्या इच्छाशक्तीमुळे शक्य झाले.
३. मेट्रो आणि बुलेट ट्रेन – ‘नको असलेला प्रकल्प’ म्हणून ज्या बुलेट ट्रेनला हिणवले गेले, त्याचे काम आज युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच मेट्रोच्या नवनवीन मार्गिका मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहेत.
‘महाविकासआघाडी’ की ‘स्पीडब्रेकर आघाडी’ ?
२०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाले. भाजपाच्या टॅगलाईन प्रमाणे महाराष्ट्र आता थांबणार नाही, अशा वेगाने महाराष्ट्र आणि मुंबई पुढे जात आहे. परंतु आता मुंबई महापालिकेच्या निमित्ताने सत्ता काबीज करण्यासाठी ज्या प्रकारे भाजपा विरोधात आघाडी – युती होत आहेत, त्याची चर्चा महाविकासआघाडी नव्हे तर स्पीडब्रेकर आघाडी अशी होत आहे.
उद्धव ठाकरे यांच्या मित्रपक्षांवर होणारे आरोप –
उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि त्यांच्या मित्रपक्षांची कार्यपद्धती ही ‘विकासविरोधी’ राहिली असून त्यांच्या नेतृत्वात सत्ता आल्यास मुंबईच्या विकासाला पुन्हा स्पीडब्रेकर लागेल, असा आरोप विरोधक करीत आहेत. मुंबईच्या प्रगतीला खीळ बसू नये यासाठी स्थगिती देणारे नाही तर गती देणारे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार अपेक्षित आहे, अशी चर्चा होत आहे.
अधिक वाचा –
– मराठी अस्मितेचा जागर की केवळ राजकीय वापर ? ठाकरेंची मुंबई महापालिकेतील सत्तेची २५ वर्षे आणि मराठीचा टक्का
– महत्वाची बातमी ! राज्यातील २९ महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

