“प्रत्येकाच्या पायाला लागते माती, कोणी आवर्जून ती लावतो माथी..
कोणी गोळा बनवून देतो आकार, बाप्पा घडवून, गणेशोत्सव होईल साकार..”
Dainik Maval News : नेहमीच वेगवेगळ्या रूपात प्रत्येकाला आपलासा वाटणारा कलाधिपती गणराया प्रत्येक कलाकाराला सदैव नवनिर्मितीची प्रेरणा देत असतो. वास्तविक काळात निसर्ग हाच खरा देव आहे. अनंत काळापासून तो आपल्याला भरभरून देत आलाय आणि पुढेही देत राहील. त्याचं संवर्धन आणि संरक्षण करणं ही काळाची गरज बनली आहे. निदान आपल्याकडून पर्यावरणाचे संतुलन बिघडणार नाही आणि प्रदूषण होणार नाही याची काळजी तरी आपण नक्कीच घेऊ शकतो. एक लहान कृती देखील मोठ्या बदलाकडे जाण्यासाठी पहिलं पाऊल ठरू शकते. त्याची सुरुवात स्वतःपासून होण्यास काय हरकत आहे. असे ताजे गावातील रवी दत्ता केदारी यांनी आपले मत मांडले आहे.
महाराष्ट्र राज्य उत्पादक शुल्क विभागात पोलीस पदी कार्यरत असणारे मावळातील ताजे गावातील रवी दत्ता केदारी हे गेल्या पाच वर्षांपासून पर्यावरपूरक गणेशोत्सव साजरा करत आहेत. त्यांना चित्रकलेची आवड असल्याने सुरवातीला २०२० साली शेतातील मातीपासून पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्ती साकारली होती. तेव्हापासुन दरवर्षी पूर्णपणे शाडूच्या मातीचा वापर करून मूर्ती साकारून ती घरी बसवून पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव साजरा करत आहोत.
मूर्तीच्या माध्यमातून ‘मुली जगवा, मुली शिकवा’ , ‘वृक्षतोड थांबवा ‘, ‘ वारकरी सांप्रदाय’ , ‘ पर्यावरण रक्षण काळाची गरज’ अशा वेगवेगळ्या सामाजिक विषयांना स्पर्श करणार्या बाप्पाच्या मूर्ती बनवण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे. यंदाचे हे शाडू मातीपासून मूर्ती साकारण्याचे सलग सहावे वर्ष. यावर्षी जगद्गुरू संत तुकोबाराय रूपातील गणेश मूर्ती साकारण्याचे भाग्य त्यांना लाभले आहे. मूर्ती बनवताना कामशेत येथील प्रसिद्ध मूर्तिकार शिंदे काका यांचे मार्गदर्शन लाभत आले आहे.
“आम्ही घरी बनविलेल्या पर्यावरणपूरक शाडू मातीच्या श्रींचे विसर्जन घरीच करतो. अवघ्या दीड-दोन तासात मूर्ती पूर्णपणे पाण्यात विरघळते. त्या मातीत आम्ही एक आठवण म्हणून एक झाड लावतो. ते झाड निसर्गात विलीन होतं. लावलेल्या झाडाच्या रुपात बाप्पाची ही कलाकृती आणि आठवण आयुष्यभर सोबत राहते.” – रवी सुगंधा दत्ता केदारी
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात हजार रुपयांची वाढ ; आता मिळणार ‘इतके’ पैसे
– वडगाव मावळ न्यायालयाच्या अत्याधुनिक इमारतीच्या कामास मंजूरी ; इमारत बांधण्यासाठी १०९ कोटी ८ लक्ष निधीस मान्यता
– मोठी बातमी ! पुणे ते लोणावळा दरम्यान तिसरी व चौथी उपनगरीय रेल्वे मार्गिका बांधण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
