पुणे (प्रतिनिधी – संध्या नांगरे ) : निरक्षर असलेल्या नकुसाबाईंना विविध कार्यक्रमानिमित्त चौकाचौकात घुमणारी प्रबोधनगीते फार आवडायची. ही गाणी गुणगुणत- गुणगुणत त्यांना तोंडपाठच झाली, त्यांच्या या आवडीला साक्षरतेची जोड मिळाली आणि मग ही प्रबोधनगीते ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे सादर करत नकुसाबाईंनी लोकजागर करण्याचा वसाच घेतला. गेली 30 वर्ष लोकजागराचा वसा त्याच उत्साहाने पेलणारी ही माऊली म्हणजे नकुसाबाई लोखंडे. ( navratri special abhivadan navdurgana )
नकुसाबाई (वय 63) गेली 40 वर्षे शहरात स्थायिक आहेत. विवाहानंतर उदरनिर्वाहासाठी त्या पुण्यात आल्या तेव्हा मोलमजूरीची कामे त्यांनी केली. नकुसाबाई निरक्षर होत्या पण शिकायची हौस होती. त्यावेळी त्या राहात असलेल्या वस्तीत झालेल्या प्रौढ साक्षरता वर्गात शिकून त्यांनी स्वतःच्या आयुष्यात साक्षरतेचा दीप प्रज्वलित केला. इतर बायकांनादेखील लिहायला-वाचायला शिकवले आणि तिथपासून नकुसाबाईंच्या सामाजिक कामाची खरी सुरवात झाली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील काही गाणी नकुसाबाईंना तोंडपाठ होती. स्त्री आधार केंद्राच्या एका शिबिरात नकुसाबाईंनी पहिल्यांदाच बाबासाहेबांवरचे गीत गायले. त्यांचे कौतुक झाले. तेव्हा नकुसाबाईंना आपल्याकडे गायनाची चांगली कला असल्याचे समजले आणि त्यांनी प्रबोधनगीते पाठ करायला सुरवात केली.
लिहायला-वाचायला अवघड जायचे पण त्या गाणी ऐकून-ऐकून पाठ करायच्या. पुढे पुढे मुलांच्या मदतीने शब्दांची जुळवाजुळव करत त्या स्वतः गाणी रचू लागल्या. विविध पुस्तके वाचून त्यांचा शब्दसंग्रहही वाढत गेला. थोरांचे विचार त्यांनी समजून घेतले. नकुसाबाईंनी आजवर थोर व्यक्तींंच्या जीवनावर बरीच गाणी रचली आहेत. त्यांच्या गाण्यांचे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. एवढेच नव्हे तर विविध प्रबोधन गीतांना चित्रपट गीतांची चाल लावून ती गाणी श्रवणीय केली आहेत.
गेली तीस वर्षे शहरात आणि शहराबाहेर होणारया विविध सामाजिक कार्यक्रमात नकुसाबाई आपल्या खड्या आवाजात प्रबोधन गीते सादर करत आहेत आणि त्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, संत तुकाराम महाराज यांचे विचार व कार्य जनमानसापर्यंत पोचवत आहेत. 70-80 गीते त्यांना मुखोद्गत आहेत. या प्रबोधनाच्या कार्यासाठी नकुसाबाईंना पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले आहे. नकुसाबाईंचे हे काम म्हणजे लोकजागराचा सातत्यपूर्ण सुंदर उपक्रम आहे.
“प्रबोधन गीतांच्या सादरीकरणातून मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि थोरांचे विचार समाजापर्यंत पोचवत राहणार आहे. त्यातून मला समाजासाठी काही काम केल्याचे समाधान मिळते. आपण सर्वांनी थोरांचे विचार जाणून घेऊन ते आचरणात आणले पाहिजेत.” – नकुसाबाई लोखंडे
अधिक वाचा –
– शेतकऱ्याचा खरा मैतर आणि जिवीचा जिवलग! मावळ तालुक्यात बैलपोळा सण उत्साहात साजरा
– सार्वजनिक नवरात्र उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी भरत गोविंद ठाकर यांची बिनविरोध निवड
– स्थानिकांची हुशारी आणि प्राणीमित्रांच्या प्रयत्नांमुळे घोरपडीला जीवनदान । Vadgaon Maval