Dainik Maval News : प्रतिनिधी – संध्या नांगरे : वडीलांच्या निधनानंतर तिने वडिलांच्या जागी नोकरी स्विकारली. पुणे महानगर परिवहन मंडळाच्या सेवेत ती ‘वाहक’ बनली. वडीलांचं काम लहानपणापासून पाहिलेलं असलं तरी आता अचानक स्वतः ‘कंडक्टर’ बनणं हे तिच्यासाठी आव्हान होतं, पण तिनं ते पेललं. वडीलांचं छत्र हरपलेल्या कुटुंबाचा ती आधार बनली. ‘बस कंडक्टर’ बनून माहेर-सासरचं नाव मोठं केलं. ही जिद्दकथा आहे पीएमपी’च्या वाहक आरती शिंदे (वय३५) यांची. त्यांच्याशी साधलेल्या संवादातून लोकसेवेसाठी झटणाऱ्या सर्व महिला वाहकांचा दररोजचा कष्टप्रद वळणांचा प्रवास उलगडला.
आरतीताई सध्या भंडारा डोंगरालगत असलेल्या इंदुरी गावात स्थायिक आहेत. त्यांचं माहेर पिंपळे गुरव असून शिक्षण बारावीपर्यंत झालं आहे. आई-वडील आणि चार भावंडं असा त्यांचा परिवार. आई गृहिणी व वडील ‘पीएमपी’मध्ये वाहक होते. मद्यपानाचं व्यसन व त्यामुळं ओढावलेल्या आजारपणानं सन २००८ मध्ये वडीलांचं निधन झालं. वडीलांशिवाय दुसरं कुणीही कमवत नसल्यानं मायलेकरं उघड्यावर पडली.
पुढं कसं करायचं हा प्रश्न होताच. मग, चार भावंडांमध्ये आरतीताई थोरल्या असल्यानं आईनं त्यांच्यावरच वडीलांच्या जागी नोकरी करण्याची जबाबदारी सोपवली. आई- भावंडांसाठी ही जबाबदारी स्वीकारण्याशिवाय ताईंकडे दुसरा पर्यायच नव्हता. त्यामुळं शिक्षण आणि हवी तशी नोकरी करण्याची इच्छा बाजूला सारुन सन २०११ मध्ये आरतीताई ‘पीएमपी’च्या सेवेत वाहक पदावर रुजू झाल्या.
तशी आधी ताईंनी नोकरीला सुरुवात केली होती. पण ते काम आणि हे वाहकाचं अनेक लोकांमध्ये जाऊन करायचं काम यात फार फरक होता. खात्यानं तीन महिन्याचं प्रशिक्षण देऊन सुरवातीची दोन वर्ष चिंचवडगावात स्थानकावरच प्रवाशांना तिकिट देण्यासाठी नेमणूक केली. स्टॅन्डवर तिकीट बुकींगचा अनुभव आला तरी प्रत्यक्ष लोक बसमध्ये मार्गावर गेल्यावर ताईंना दडपण आलं होतं. सुरुवातीला दिवसाअखेर तिकीटांचा हिशेब देताना हिशेबात गडबड व्हायची. मग, ‘घरी आपणच कमवती आहोत. पुन्हा पुन्हा हिशेबात चूक व्हायला लागली तर कसं होईल’, याचा ताण यायचा. त्या रडायच्या देखील. प्रवाशांच्या गर्दीत काम करताना गोंधळ व्हायचा. पण, ‘घरासाठी आपल्याला ही नोकरी व्यवस्थित पार पाडायची आहे’ ही एकच गोष्ट समोर ठेवून ताई चिकाटीनं काम करत राहिल्या, कामात अचूकता आणली. विवाहानंतरही त्या त्याच उमेदीनं काम करत गेल्या १३ वर्षांत त्या उत्तम वाहक बनल्या आहेत. मनपा, भोसरी, हिंजवडी, वासुली, किवळे या मार्गांवर काम केलंय.
- सहा-सात वर्षांपूर्वी आरतीताईंना तीन वर्ष तिकीट तपासणीस पदावर काम करण्याची संधी मिळाली. तेव्हा त्यांची मुलगी फक्त सात-आठ महिन्यांची होती. या नेमणूकीचा आदेश खात्यानं अचानाकच काढला होता. त्यासाठी स्वारगेट डेपोला त्यांची बदली झाली. तेव्हा घरी बाळ असताना स्वारगेट ते इंदुरी एवढं जाणं-येणं कसं निभावणार हे आव्हान ताईंसमोर आलं. पण तिकीट तपासनीस ही आपल्याला मिळालेली बढतीची संधीच आहे ही भूमिका समोर ठेवली आणि बारा-बारा तास घराबाहेर राहून ताईंनी आव्हान पेललं.
आरतीताई भंडारा डोंगराजवळच्या इंदुरी गावात राहतात. तेथून निगडी डेपो १७-१८ किलोमीटर अंतरावर असल्यानं कामावर येण्यासाठी पहाटेच घरातून निघावं लागतं. पती रोज सोडायला येतात. पण ताईंची छोटी मुलगी आई दिवसभर भेटत नसल्यानं कधी कधी रडते, ‘आई तू आज कामावर जाऊ नको’, ‘मला शाळेत सोडायला ये’, ‘तूच मला अंघोळ घाल’, ‘तूच मला जेवू घाल.’, असं आर्जव करत असते. पण नोकरीपुढं लेकराचे हट्ट बाजुला ठेवावे लागतात. कामात दररोजचंच दगदग असल्यामुळं ताईंना रक्तदाब, मानदुखी असे त्रास सुरु झाले आहेत. या सगळ्यांत कुटुंबाची साथ असल्यानं ताई नोकरीची जबाबदारी चोख पार पाडत आहेत. ‘पीएमपी’च्या निगडी डेपोतील त्या एक गुणी कडक शिस्तीच्या महिला वाहक आहेत. उत्तम वाहक बनून ताईंनी आई-वडिलांचं आणि सासरचं नाव मोठं केलं आहे.
आरतीताईंची वाटचाल हे ‘पीएमपी’च्या सर्व महिला वाहकाचं प्रातिनिधिक उदाहरण. लोकसेवा क्षेत्रात काम करताना या महिला वाहकांना दररोजच खडतर प्रवास करावा लागतो. बऱ्याच अडचणी आहेत. कंडक्टर असल्यानं सातत्यानं उभं राहावं लागतं. घटकाभर विश्रांती घ्यायची म्हटलं तर गाडी वेळेत न्यायची असल्यानं वेळच मिळत नाही. बहुतांश स्थानकावर विश्रांती कक्ष नसल्यामुळं ताटकळावंच लागतं. स्वच्छतागृहाच्या अभावामुळं मोठी गैरसोय होते आणि मासिक पाळीच्या दिवसातील त्रास कामात कोणाला सांगताही येत नाही. गपचूपपणे त्या वेदना सहन करतात. प्रवाशांच्या गर्दीत कधी नकोसा स्पर्श होतो, त्यामुळं तिथं सतत चंडिका बनूनच राहावं लागतं. नाना प्रकारच्या प्रवाशांना तोंड द्यावं लागतं.
प्रवाशांच्या सेवेत आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत या दुर्गा सणावाराला आपल्यासाठी कामावर येतात. स्वतःच्या कुटुंबियांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. सण, नटण्या-सजण्याची हौसही त्यांना बाजूला ठेवावी लागते. पण, अंगावर असलेली खाकी वर्दी त्यांच्यासाठी नेहमीच महत्त्वाची आणि अभिमानाची असते. म्हणूनच आपण या दुर्गांप्रती कृतज्ञता व्यक्त करुया.
आरतीताई म्हणतात, “पीएमपी’ची वाहक म्हणून काम करताना मला स्वतःची वेगळी ओळख मिळाली आहे. डेपोमध्ये वडीलांच्या आठवणी जाग्या होतात. आधी मी घाबरट होते. कंडक्टर झाल्यावर कणखर आणि धाडसी बनले आहे. कंडक्टरची नोकरी मी करुन दाखवली याचं माझ्या आईला मोठं कौतुक आहे. भविष्यात बढती होऊन मला आमच्या खात्यातच कार्यालयीन पातळीवर काम करण्याची इच्छा आहे.”
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अभिवादन नवदुर्गा : ‘दैनिक मावळ’च्या नवदुर्गा – 2023
1. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । ‘मुलींच्या शिक्षणासाठी ती झालीये सरस्वती अन् लक्ष्मी’, गोष्ट वनिता सावंत यांच्या ध्येयाची…
2. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । प्रबोधन गीतांच्या सादरीकरणातून त्या करताहेत लोकजागर; नकुसाबाई लोखंडेंचा प्रेरणादायी जीवनप्रवास
3. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । ‘आईच्या मायेने वंचित लेकरांना ती घडवतेय…’ समाजसेविका गौरी सोनवणे यांची प्रेरणादायी वाटचाल
4. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । कुटुंबाचा विरोध झुगारून ती बनली बस कंडक्टर; वाचा ‘डॅशिंग लेडी कंडक्टर’ रेश्मा सय्यद यांचा जीवनप्रवास
5. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । रुपेरी पडद्यापर्यंत पोहोचताना बहरलीये ‘फुलराणी’, अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरचा थक्क करणारा प्रवास
6. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । तिच्याच ‘लेखणीनं’ सोडवली तिची चौकटीतील घुसमट; कवयित्री कल्पना दुधाळ यांचा वाखण्याजोगा लेखनप्रवास
7. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । शिल्पकाराने घडवले लेकीच्या जीवनाचे शिल्प; शिल्पकार सीमा खेडकर-शिर्के यांची कलाप्रांतातील जडणघडण
8. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । खाद्यपदार्थांच्या व्यवसायाने आला आयुष्यात गोडवा; कष्टप्रद वाटेवरुन चालणाऱ्या रजनीताई कराळेंची संघर्षकहाणी
9. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । रसिकमनावर बिंबलाय तिच्या स्वरातील अन् वाणीतील गोडवा; प्रसिद्ध निवेदिका स्नेहल दामलेंची भरारी