पवनमावळ भागातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वारू-ब्राह्मणोली ग्रामपंचायतमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असलेल्या या ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरोधात अविश्वासाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
ग्रुप ग्रामपंचायत वारु-ब्राम्हणोली गावचे सरपंच शाहिदास मारुती निंबळे यांच्या विरुद्धचा अविश्वास ठराव दिनांक 13 जून 2023 रोजी झालेल्या विशेष बैठकीत ग्रामपंचायतीचे सदस्यांनी बहुमताने मंजूर केल्याने, सरपंच शाहिदास निंबळे यांची पदावरुन गच्छंती करण्यात आली आहे. तशी अंतिम मंजूरी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिनांक 14 जून रोजी दिली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
ग्रुप ग्रामपंचायत वारु – ब्राह्मणोली मध्ये एकूण सदस्य संख्या ही 9 आहे. शाहिदास मारुती निंबळे यांची सरपंच पदी निवड होऊन दोन वर्ष उलटून गेली, मात्र त्यांनी ठरवल्याप्रमाणे पदाचा राजीनामा दिला नव्हता, असे काही सदस्यांनी सांगितले. तसेच, त्यांचा कारभार मनमानी पद्धतीने होत असल्याची तक्रार सुनिता निंबळेंसह सात सदस्यांनी तहसीलदार मावळ यांच्याकडे केली होती. त्यानुसार तहसीलदार यांनी ग्रामपंचायत कार्यालय इथे विशेष सभा बोलावली होती. त्यानुसार दिनांक 13 जून रोजी ग्रामपंचायत कार्यालय इथे विशेष सभा आयोजित केली. ( no confidence motion passed against sarpanch shahidas nimble of varu bramhanoli group gram panchayat )
दोन वर्षे पूर्ण झाल्यामुळे नियमानुसार ग्रामपंचायतीच्या उर्वरित सदस्यांनी विद्यमान सरपंच शाहिदास मारुती निंबळे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला. हा प्रस्ताव बैठकीत सदस्याने 8-1 अशा बहुमताने मंजूर केला. तहसीलदार विक्रम देशमुख यांनी या विशेष सभेचा अहवाल तपासून दिनांक 14 जून 2023 रोजी याबाबत अधिकृत जाहीर केल्याने, वारू-ब्राह्मणोली सरपंच पदावरुन अखेर शाहिदास मारूती निंबळे यांची गच्छंती झाली आहे.
लवकरच ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा बोलावून नव्या सदस्याची सरपंच पदी नियुक्ती केली जाणार आहे आणि गावच्या विकासाचा गाडा पुन्हा सुरु केला जाईल, असे ग्रामपंचायत सदस्यांनी दैनिक मावळसोबत बोलताना सांगितले.
अधिक वाचा –
– आमदार शेळकेंसमवेत मावळ बाजार समितीच्या संचालकांनी घेतली पणन संचालकांची भेट, ‘या’ विषयांवर झाली चर्चा
– ‘तुंगार्ली धरणाची दुरुस्ती व्हावी, धरण परिसरात सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी’, स्थानिकांचे लोणावळा नगरपरिषदेला निवेदन