Dainik Maval News : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाईला ‘थर्टी फर्स्ट’चे वेध लागले आहेत. 31 डिसेंबरला मावळ आणि मुळशी परिसरातील हॉटेल व रेसॉर्टमध्ये पार्ट्या होतात. या पार्ट्यांवर, जल्लोषावर पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासनाची (एफडीए) करडी नजर असणार आहे. एफडीएचे 15 अधिकारी यासाठी तैनात असणार आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात हिंजवडी, रावेतसह लगतच्या परिसरात मोठ्या संख्येने आयटी क्षेत्रात काम करणारी तरुणाई राहते. या तरुणाईकडून रो-हाउस, हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये पार्ट्यांचे नियोजन केले जात आहे. हिंजवडी, लोणावळा, खंडाळा, पवना बॅकवॉटर, आंदर मावळ आणि पवनमावळ, वडिवळे धरण, कासारसाई, मुळशी धरणाच्या परिसरात रेसॉर्ट, खासगी रो-हाउस, हॉटेलमध्ये पार्ट्या होतात.
या पार्ट्यांवर अन्न आणि औषध प्रशासनाची करडी नजर असणार आहे. फूड सेफ्टी ऑफिसरकडून हॉटेल्सची तपासणी केली जाणार असून, अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत. कमी दर्जाचे, बनावट आणि असुरक्षित अन्नपदार्थ आढळल्यास त्या हॉटेल चालकांवर कारवाई केली जाणार आहे. पुणे जिल्ह्यात एफडीएचे १५ अधिकारी असून, हॉटेलची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. कमी दर्जाचे आणि असुरक्षित अन्नपदार्थ आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती सहआयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, सुरेश अन्नपुरे यांनी दिली.
पवनानगर भागात दरवर्षी नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या पार्श्वभूमीवर हॉटेल, टेंन्ट मालकांची नुकतीच बैठक घेऊन त्यांना ३१ डिसेंबरला जादा कर्मचारी नेमण्याचे, क्षमतेपेक्षा जादा नागरिकांना प्रवेश न देण्याचे आदेश दिले आहेत, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने तेथे येणाऱ्या प्रत्येकाचे आधार कार्ड क्रमांक, गाडी क्रमांक यांची नोंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. – किशोर धुमाळ, पोलिस निरीक्षक, लोणावळा ग्रामीण.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पिंपरी-चिंचवडला ‘वॉटर प्लस सिटी’ बनविण्यासाठी निधीची मागणी ; खासदार बारणेंनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट
– तळेगाव नगरपरिषदेकडून शंभर टक्के कर वसुलीचे ध्येय ! नागरिकांनी थकीत कर तत्काळ भरण्याचे आव्हान । Talegaon News
– महाराष्ट्राला वीस लाख घरे मंजूर ! प्रत्येक गरीब, शेतकऱ्याला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पक्के घर मिळणार