Dainik Maval News : मावळ तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय वातावरण तापलेले असताना शनिवारी (दि.१७) एका मोठा राजकीय भूकंप इंदुरी-वराळे गटाच्या निमित्ताने पाहायला मिळाला. इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) पक्षाचे प्रबळ उमेदवार असलेल्या मेघा भागवत आणि त्यांचे पती, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत भागवत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत थेट भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला आहे. सोबतच काही तासांत भाजपाने मेघा भागवत यांना इंदुरी – वराळे जिल्हा परिषद गटातून भाजपाची अधिकृत उमेदवारी देखील जाहीर केली आहे.
याप्रसंगी केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे खासदार मुरलीधर मोहोळ, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपा नेते गणेश भेगडे, गुलाबराव म्हाळसकर आदी भाजपाचे प्रमुख पदाधिकारी, नेते उपस्थित होते. मेघा भागवत, प्रशांत भागवत यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, भाजपात प्रवेश आणि भाजपाची झेडपीची उमेदवारी, ही संपूर्ण घटना मावळ राष्ट्रवादीसाठी धक्कादायक असून “कालपर्यंत सोबत असलेले भागवत अद्याप कुठलीही उमेदवारी जाहीर झालेली नसताना अचानक कसे पक्ष सोडून गेले, हा पक्षाचा विश्वासघात आहे, आम्हीही या घटनेने व्यथित आहोत,” अशी प्रतिक्रिया मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिली आहे.
मेघा भागवत यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी जाहीर करीत असतानाच भाजपाने या गटातील पंचायत समितीच्या दोन्ही गणातील उमेदवार जाहीर केले आहेत. वराळे पंचायत समिती गणातून रविंद्र निवृत्ती शेटे आणि इंदुरी गणातून श्रीकृष्ण आण्णासाहेब भेगडे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे.
राष्ट्रवादीकडून तयारी आणि भाजपाकडून उमेदवारी
जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत होण्यापूर्वी इंदुरी गट ओबीसी प्रवर्गासाठी येईल, असे गृहीत धरून प्रशांत भागवत यांनी निवडणुकीची तयारी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य असल्याने भागवत राष्ट्रवादीकडूनच इच्छुक होते. दरम्यान आरक्षण सोडतीत ही जागा सर्वसाधारण महिलेस आरक्षित झाल्याने प्रशांत भागवत यांनी आपल्याऐवजी पत्नी मेघा भागवत यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवयाचं ठरवून तयारी चालूच ठेवली. परंतु आता प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यांनी थेट भाजपात पक्षप्रवेश करून तिकीट मिळविल्याने त्यांच्या या निर्णयाबद्दल नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा होत आहे.
पक्षाचा निर्णय होण्यापूर्वीच पक्षांतर केल्याने टीका
दरम्यान प्रशांत भागवत, मेघा भागवत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देताना इंदुरी-वराळे गटातील उमेदवारीचा उल्लेख करून ही उमेदवारी दुसऱ्या आयात उमेदवाराचा दिल्याचे लिहिलंय. परंतु अद्याप राष्ट्रवादीकडून याठिकाणी उमेदवारांची घोषणा झालेली नाही. अशात भागवत यांनी राजीनामापत्र देणे, तत्काळ भाजपात प्रवेश करणे आणि निवडणुकीचे तिकीट मिळविणे याबद्दल कार्यकर्ते व सामान्य नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. पक्षाने निर्णय घेण्यापूर्वीच कार्यकर्त्याने पक्ष सोडणे आणि पक्षाला दोष देणे, हे चुकीचे असल्याचे नागरिक, कार्यकर्ते सांगत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– भाजपाचा विजयी सूर मावळमध्ये चमत्कार घडविणार? मावळ भाजपाला जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत नवसंजिवनीची अपेक्षा
– महत्वाची बातमी ! सायकल स्पर्धेकरिता मावळमधील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
– मावळचा लेक बनला मुंबईचा नगरसेवक ! मावळातील पारिठेवाडी येथील मंगेश पांगारे मुंबई मनपा निवडणुकीत नगरसेवकपदी विजयी
– वडगावची लढाई आणि ऐतिहासिक तह.. मराठ्यांच्या इतिहासातील सोनेरी पान : पानिपतावरील पराभवाचा वचपा मराठ्यांनी मावळभूमीवर काढला
