Dainik Maval News : पिंपरी-चिंचवड शहराची वाढणारी लोकसंख्या पाहता निगडीतील भक्ती-शक्ती चौक ते किवळे, मुकाई चौक, वाकड (हिंजवडी मेट्रो स्टेशन), पिंपळे सौदागर ते चाकण पर्यंत मेट्रो रेल्वे प्रकल्प करण्याची अतिशय आवश्यकताआहे. त्यामुळे या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम तातडीने हाती घ्यावे. डीपीआर पूर्ण करुन नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी, अशी मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे केली आहे.
खासदार बारणे यांनी केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्र हे देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरी क्षेत्रांपैकी एक आहेत. या जलद शहरीकरणामुळे लोकसंख्या आणि वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येत आहे.
त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात मेट्रो रेल्वे प्रकल्पाची घोषणा केली होती. सध्या या भागात विविध मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. यामुळे नागरिकांना निश्चितच एक सुलभ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक वाहतूक पर्याय उपलब्ध होईल.
केंद्र सरकारने निगडी ते भक्ती शक्ती चौकापर्यंत मेट्रो विस्ताराला मान्यता दिली आहे आणि या मार्गावर बांधकाम सुरू आहे. पिंपरी-चिंचवडची वाढती लोकसंख्या, वाहतूक आणि भविष्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रोचे जाळे विणण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी भक्ती शक्ती चौक ते चाकण मार्गे किवळे, मुकाई चौक, वाकड ( हिंजवडी मेट्रो स्टेशन), पिंपळे सौदागर पर्यंत मेट्रो विस्ताराची नितांत आवश्यकता आहे.
हा मार्ग औद्योगिक, शैक्षणिक आणि निवासी दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. या मार्गावर मेट्रोचा विस्तार परिसराच्या सर्वांगीण विकासात उपयुक्त ठरेल. त्यामुळे भक्ती शक्ती चौक ते चाकण मार्गे किवळे, मुकाई चौक, वाकड (हिंजवडी मेट्रो स्टेशन), पिंपळे सौदागर पर्यंत मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करावा. त्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात आमसभा आयोजित करण्याची मागणी ; शिवसेनेकडून प्रशासनाला निवेदन । Maval News
– वडगावातील तरूणाईत वाढत्या व्यसनाधीनतेमागे शहरातील अवैध धंदे ; पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी
– पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी बिगर कर्जदार आणि कर्जदार शेतकऱ्यांसाठी मुदतवाढ ; जाणून घ्या