पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (दि. 6 मार्च) पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी, पुणे मेट्रोचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी, पुणे मेट्रोला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधानांनी कोलकाता येथून विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील या मेट्रो प्रकल्पांची ऑनलाईन प्रणालीद्वारे सुरुवात केली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
या कार्यक्रमासाठी सह्याद्री अतिथीगृह येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदींनी लोकार्पण केलेला पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा मेट्रो मार्ग सहा किलोमीटरचा असून 5 फेब्रुवारी 2024 रोजी या मेट्रोची ट्रायल रन झाली आहे. ( Prime Minister Narendra Modi inaugurated metro projects in Pune and Pimpri Chinchwad cities )
यापूर्वी 6 मार्च 2022 रोजी पीसीएमसी ते फुगेवाडी या सात किलोमीटर आणि वनाज ते गरवारे पाच किलोमीटर मेट्रो मार्गाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले होते. फुगेवाडी ते सिविल कोर्ट 6.91 किमी आणि गरवारे ते रुबी क्लिनिक 4.75 किमी अशा मेट्रोच्या टप्प्यांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते 1 ऑगस्ट 2023 रोजी करण्यात आले होते. आणि बुधवारी (दि. 6) रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या सहा किलोमीटर मार्गाचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.
पंतप्रधानांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी या पहिल्या टप्प्यातील मेट्रोचे भूमिपूजन देखील करण्यात आले. हा मार्ग 4.4 किमीचा असून पूर्णपणे उन्नत मार्ग आहे. यामुळे स्वारगेट ते पीसीएमसी कॉरिडॉर हा निगडीपर्यंत विस्तारित होणार आहे.
‘वाढत्या शहरीकरणामुळे स्मार्ट आणि दर्जेदार वाहतुकीची गरज आहे. मेट्रो सेवेमुळे ही गरज पूर्ण होऊन इंधन आणि वेळेत देखील मोठी बचत होणार आहे. मोदींची गॅरंटी असलेले सर्व प्रकल्प आणि विकास कामे गतीने सुरू असल्यामुळे महाराष्ट्राला मोठा फायदा होत आहे.’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अधिक वाचा –
– उमरठ येथील ‘नरवीर तानाजी मालुसरे’ यांच्या समाधीस्थळासाठी 10 कोटी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा!
– श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला शाळेची चमकदार कामगिरी, ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेत तालुक्यात दुसरा क्रमांक
– लोणावळ्यात शरद पवारांची तोफ धडाडणार! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा गुरुवारी कार्यकर्ता संवाद मेळावा