Dainik Maval News : भारतीय महिला खो-खो संघाने नुकताच पहिला खो-खो विश्वचषक जिंकला. यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. परंतु मावळवासीयांसाठी ही गोष्ट आणखीन आनंददायी आहे, याचे कारण म्हणजे विश्वविजेत्या महिलांच्या खो-खो संघाची कर्णधार ही तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेची माजी विद्यार्थिनी आहे. भारतीय महिला खो-खो संघाची कर्णधार प्रियंका इंगळे ही इंद्रायणी महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी आहे. यामुळे मावळशी तिचे खास नाते आहे.
प्रियंका इंगळेच्या नेतृत्वाखाली भारताने नेपाळ संघाचा अंतिम सामन्यात 38 गुणांच्या फरकाने पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले. या यशाबद्दल इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे आधारस्तंभ, माजी आमदार कृष्णराव भेगडे, संस्थेचे अध्यक्ष रामदास आप्पा काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांनी प्रियंका इंगळे आणि भारतीय महिला संघाचे अभिनंदन केले.
- प्रियंका इंगळे ही इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी आहे. प्रियंका इंगळे हिचे मूळ गाव बीड जिल्ह्यातील असून ती पुण्याच्या पिंपरी-चिंचवड येथील वडमुखवाडी येथे लहानाची मोठी झाली. तिने प्राथमिक शिक्षण श्री सयाजीनाथ महाराज विद्यालय, वडमुखवाडी येथे पूर्ण केले, जिथे तिला खो-खो खेळात करिअर करण्याची संधी मिळाली. वयाच्या बाराव्या वर्षापासून प्रियंकाने राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. सातवीत असतानाच तिने तिच्या कारकिर्दीतील पहिली राष्ट्रीय स्पर्धा खेळली होती.
प्रियंका हिने पंधरा वर्षांच्या खेळाडू आयुष्यात तब्बल 23 राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. 2023 मध्ये तिने चौथ्या आशियाई खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले, तर २०२२ मध्ये तिला राष्ट्रीय स्तरावरील राणी लक्ष्मीबाई पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. प्रियंकाच्या विजयामुळे इंद्रायणी महाविद्यालय आणि मावळ तालुक्याची मान उंचावली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण? पाहा संपूर्ण यादी – महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री
– ‘एमएसआयडीसी’कडून तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कामाचा मसुदा सादर, आता निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
– मावळच्या विकासासाठी कटिबद्ध, जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार – खासदार श्रीरंग बारणे