Dainik Maval News : पुणे ग्रामीण जिल्ह्यात कोणत्याही खाजगी व्यक्ती, कार्यक्रम व्यवस्थापन (इव्हेंट मॅनेजमेंट) व छायाचित्रण करणाऱ्या व्यावसायिकांनी ड्रोन कॅमेराचा वापर करताना त्याची पूर्व माहिती ७ दिवस आधी संबंधित पोलीस ठाण्यास कळवून संबंधीत प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांची रितसर परवानगी घेणे बंधनकारक राहील, असे आदेश जारी करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात महत्त्वाची धार्मिक स्थळे, धरणे, केंद्रीय संस्था असून दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोन कॅमेराद्वारे टेहळणी होवून त्याचा अतिरेकी कारवायांमध्ये उपयोग केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दौंड, बारामती, शिरुर तालुक्याच्या परिसरामध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन उडत असल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असून नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाळू माफिया देखील टेहळणीसाठी ड्रोनचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ड्रोनच्या माध्यमातून टेहाळणी करुन इतर प्रकारच्या चोऱ्याही होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.
पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन, रिमोट-नियंत्रित मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा मोटर्स, हँग ग्लायडर, हॉट एअर बलून आणि तत्सम सर्व हवेत उडणाऱ्या वस्तूंच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. कोणतीही खाजगी व्यक्ती, इव्हेंट मॅनेजमेंट व छायाचित्रण करणारे व्यावसायिकांनी ड्रोन कॅमेराचा वापर करताना त्याची पूर्व माहिती ७ दिवस अगोदर संबंधित पोलीस ठाण्याला देवून परवानगी घेणे बंधनकारक आहे.
आदेशाचा भंग करुन पोलीसांच्या परवानी शिवाय कोणताही व्यक्ती ड्रोन कॅमेरादवारे चित्रीकरण करताना आढळून आल्यास अशी व्यक्ती भारतीय न्याय संहितेचे कलम २३३ प्रमाणे पात्र राहतील, असेही अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ पंचायत समितीवर असणार महिलाराज ; सभापतीपद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव । Maval Panchayat Samiti
– लोणावळ्यात मनसैनिकांनी कसली कंबर ! नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबरदस्त शक्तीप्रदर्शन, शेकडोंचा पक्षप्रवेश । Lonavala MNS
– कोण होणार तुमच्या शहराचा नगराध्यक्ष? राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर – पाहा संपूर्ण यादी

