Dainik Maval News : पुणे-लोणावळा या रेल्वे मार्गाच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या कामाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यासाठी राज्य सरकारची ५० टक्के हिश्श्याची रक्कम तातडीने द्यावी. त्यामुळे काम सुरु करण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
खासदार बारणे यांनी याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. तसेच त्यांना तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेबाबत सविस्तर माहिती दिली. या प्रकल्पातील राज्य सरकारचा हिस्सा तातडीने देण्याची मागणी केली.
खासदार बारणे म्हणाले, गेल्या तीन दशकांपासून पुणे, लोणावळा दरम्यान तिसरा आणि चौथा ट्रॅक व्हावा अशी मावळ लोकसभा मतदारसंघातील आणि पुणे शहरातील नागरिकांची मागणी आहे. २०१४ मध्ये मी निवडून आल्यानंतर त्यासाठी पाठपुरावा सुरु केला. केंद्र सरकारने २०१५-१६ मध्ये पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसरा आणि चौथ्या ट्रॅक करण्याची घोषणा केली. त्याचा विकास आराखडा (डीपीआर) तयार केला. १५ फेब्रुवारी २०१९ मध्ये रेल्वे बोर्डाने महाराष्ट्र सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. त्यासाठी २०१७ मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद देखील केली.
प्रकल्पाचा ५० टक्के खर्च केंद्रीय रेल्वे विभाग आणि ५० टक्के राज्य सरकार, अशी खर्चाची विभागणी आहे. राज्याच्या ५० टक्यांमध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सहभाग राहणार आहे. अनेक वर्ष हा प्रकल्प रखडला आहे. राज्य सरकारने आपल्या हिश्श्याचा निधी न दिल्यामुळे प्रकल्पाला विलंब होत आहे. नागरिकाची सोय आणि लोकल सेवा सुरळीत होण्यासाठी ह्या मार्गिक होणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे पुणे – लोणावळा तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकांसाठी राज्य सरकारच्या हिश्श्याचा निधी तत्काळ मिळावा, असे बारणे यांनी सांगितले.
तिसरा, चौथा ट्रॅक करण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे सहकार्य करीत आहेत. मागील आठवड्यात ते पुणे दौऱ्यावर आले असता त्यांनी या कामाला तत्काळ सुरुवात करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनीही निधी देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्य सरकारचा हिस्सा मिळून लवकरच कामाला सुरुवात होईल, अशी आशा आहे.
अधिक वाचा –
– मावळ मनसेत पडणार खिंडार? माजी तालुकाध्यक्ष शरद पवारांच्या पक्षात जाणार? नेत्यांच्या भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण । Maval News
– मावळमध्ये काँग्रेसला मोठा झटका ! युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षाने सोडला ‘हात’, शिवसेनेला देणार साथ । Maval News
– लोणावळ्यात शिवसेना उबाठा पक्षाला खिंडार ! अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेत पक्षप्रवेश
– मुंबई-पुणे प्रवास होणार सुखकर ! राज्य सरकारचा महत्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अंतिम टप्प्यात । Mumbai Pune Missing Link