Dainik Maval News : संपूर्ण राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचे सावट दिसून येत आहे. राज्यातील बहुतांष जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत आहे. तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. दिवाळीच्या आसपास खरीप हंगामातील पिके काढणीस येतात, त्यामुळे सध्याचे पावसाचे वातावरण पाहता शेतकरी चिंतेच्या गर्तेत अडकल्याचे दिसत आहे.
मागील आठवडाभरापासून विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागांसह उत्तर महाराष्ट्र, कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे आलेला कांदा, सोयाबीन, वेचणीवर आलेला कापूस, मका, टोमॅटो, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर पावसाच्या धसक्याने रायगड, पुणे जिल्ह्यातील भातकापणी ठप्प पडली असून, अनेक ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेली आहे.
पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे सक्रिय झाल्यामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी नैर्ऋत्येकडे सरकले. पुढील २४ तासांत हे कमी दाबाचे क्षेत्र नैर्ऋत्येकडे आणि नंतर पूर्व-मध्य अरबी समुद्र ओलांडण्याची शक्यता आहे. हे कमी दाब क्षेत्र महाराष्ट्र किनारपट्टीजवळून प्रवास करणार असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक असेल.
मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना :
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम किनारपट्टीवर २५ ते २९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग ३५ ते ४५ किमी प्रतितास राहील. काही ठिकाणी तो ५५ किमी प्रतितासपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे हवामान विभाग आणि भारतीय तटरक्षक दलाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. समुद्रामध्ये असलेल्या सर्व मासेमारी नौकांनी तात्काळ सुरक्षितपणे बंदरात परत यावे तसेच स्थानिक बंदर अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– हजारोंची गर्दी… दमदार एन्ट्री… बापूसाहेब भेगडे यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज ! चार पक्षांचे तालुकाध्यक्ष उपस्थित
– मोठी घडामोड ! भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना सोबत घेवून रविंद्र भेगडे यांनीही भरला उमेदवारी अर्ज । Maval Vidhan Sabha
– उमेदवाराची ओळख : सुनिल शेळके यांचे शिक्षण किती? कौटुंबिक माहिती आणि राजकीय कारकीर्द, वाचा सविस्तर



