Dainik Maval News : मावळ तालुक्यात ग्रामीण भागात सध्या भात लागवडीचा हंगाम सुरू आहे. चांगल्या पद्धतीने वाढलेल्या भात रोपांची योग्य प्रकारे लागवड करण्यात शेतकरी वर्ग मग्न आहे. पावसाचे वातावरण सुसह्य असल्याने लवकरात लवकर भात लागवड पूर्ण करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. पवन मावळ परिसरात भात लागवडींनी वेग घेतला असून कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार येथील बहुतांश शेतकरी चारसूत्री पद्धतीने भात लागवड करीत आहेत.
- मावळ तालुक्याला भाताचे कोठार समजले जाते. पवन मावळातील सोमाटणे भागातील अनेक गावांतील शेतकरी आता आधुनिक पद्धतीने शेती करीत आहेत. सध्या पडत असलेला पाऊस भात पिकासाठी पोषक असल्याने शेतकऱ्यांनी भात लागवडी सुरू केल्या असून येथील शेतकरी चारसूत्री पद्धतीने भात लागवड करीत आहेत. येथील शेतकरी रामदास सोरटे यांनी दोन एकर क्षेत्रावर चारसूत्री पद्धतीने भात लागवड केली असून यातून उत्पादन वाढीची अपेक्षा वर्तवली आहे.
अशी केली जाते चारसूत्री भात लागवड :
दोरीच्या सहाय्याने चारसूत्री पद्धतीने भात लागवड केली जाते. 25 बाय 25 सेंमी अंतरावर दोरी तयार करून रोपे लावली जातात. रोप लागवडी नंतर यूरिया ब्रिकेट खत गोळ्याचा वापर चार चूडाच्या मधे एक गोळी अशा प्रकारे केला जातो. लागवडीच्या दोन ते तीन दिवसानंतर ही मात्रा दिली जाते. या पद्धतीने भात लागवड केल्यास कमी भात रोपे लागत असल्याने ही पद्धत परवडणारी आहे.
सद्यस्थितीत साळूंब्रे, गोडुंब्रे, शिरगाव, सांगवडे, गहूंजे, दारुंब्रे परिसरात 200 हेक्टर क्षेत्रावर चारसूत्री पद्धतीने भात लागवड केली जाणार असल्याचे सहायक कृषी अधिकारी विकास गोसावी यांनी सांगितले.
पवन मावळ विभागात भात लागवडी सुरु आहेत. शेतकरी आधुनिक पद्धतीने लागवडी करू लागले आहेत. चारसूत्री, एस.आर.टी., यंत्राद्वारे भात लागवड अशा पद्धतींचा अवलंब शेतकरी करू लागले आहेत. नवनवीन तंत्रज्ञान वापरून भात उत्पादनात वाढ करणे हेच कृषी विभागाचे ध्येय आहे, असे सहाय्यक कृषी अधिकारी विकास गोसावी यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पवना धरणावर धोकादायक पद्धतीने डागडुजी ; धरण 75 टक्के भरलेले असताना सांडव्यावर क्रेन चढवून दुरुस्तीचे काम । Pavana Dam
– लम्पी चर्मरोग प्रादूर्भावामुळे मावळ तालुक्यातील पशूधन धोक्यात ; तातडीने लसीकरण मोहीम हाती घेण्याबाबत प्रशासनाला निवेदन । Maval News
– लोणावळा बस स्थानकाचे रूपडे पालटणार ! टेंडर प्रक्रिया पूर्ण करून लवकर काम सुरू होणार ; परिवहन मंत्र्यांचे आश्वासन । Lonavala News