मावळ तालुका हा जसा पर्यटनासाठी प्रसिद्ध तसेच तांदळाच्या उत्पादनासाठीही प्रसिद्ध. त्यामुळे मावळ तालुक्याला भाताचे आगार असे म्हटले जाते. मावळ तालुक्यातील काही शेतकरी पारंपारिक तर काही शेतकरी आधुनिक पद्धतीने भातपिक घेत असतात. शेतकऱ्यांना भाताचे उत्पादन घेण्यासाठी वर्षातील 6 ते 7 महिने शेतात खर्ची घालावे लागतात. त्यानंतर हाती पिक येत असतं. यात पुन्हा नैसर्गिक आपत्ती आदी संकटेही आ वासून असतात. परंतू ह्या सर्वांशी तोंड देणारा शेतकरी आता अलिकडे आणखीन एका समस्येने त्रस्त झाला आहे, ते म्हणजे बोगस बियाणे. ( Rice Seeds Turned Out To Be Bogus Big Loss To Farmer In Maval Taluka )
अलिकडेच मावळ तालुक्यातील कुसगाव पमा याठिकाणचे भात उत्पादक शेतकरी संतोष तापकीर यांनी (एका नामवंत कंपनीचे) भाताचे बीज घेतले होते. मात्र आता भात लागवड होऊन त्याला फुटवे फुटायला लागल्यानंतर सदरचे बियाणे हे निकृष्ट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. हाताशी आलेले पीक निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सदर शेतकऱ्याने याची तक्रार केली आहे, परंतू आता त्यांचे हे आर्थिक नुकसान कसे आणि कधी भरून निघणार हा प्रश्न आहे.
शेतकऱ्याने याबाबत तालुका कृषी अधिकारी दत्ता पडवळ यांच्याशी संपर्क साधल्यानंतर शेतात पंचनामा करण्यात आला. साधारण 10 एकर मध्ये घेतलेल्या पिकाचे नुकसान हे केवळ बोगस बियाणांमुळे झाल्याचा आरोप शेतकऱ्यानी केलाय. तर दुसरीकडे कृषी अधिकारी यांनी मात्र बियाणे बोगस नसून वातावरणामध्ये बदल होत असल्याने पिकांवर परिणाम झाल्याचे सांगितले. ह्यात खरे काय ते लवकरच समजेल. परंतू पिकाचे नुकसान होणे हे सर्वसामान्य शेतकऱ्याला आर्थिक समस्या आणि चिंतेच्या गर्तेत ढकलणारी बाब आहे. यावर प्रशासनाने योग्य ते उपाययोजना करुन शेतकऱ्याला न्याय मिळवून देणे आवश्यक आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– वडगाव शहरात गोकुळाष्टमी निमित्त आयोजित अखंड हरिनाम साप्ताहची उत्साहात सांगता
– मोठी बातमी! ‘छत्रपती शिवरायांनी अफजलखानाचा कोथळा काढताना वापरलेली वाघनखे लवकरच भारतात आणणार’
– प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल! राजकारणात अस्पृश्यता पाळत असल्याची टीका