Dainik Maval News : मावळचे आमदार सुनील शेळके यांनी शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याबाबत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले असून ह्या प्रकरणात ‘एसआयटी’ नेमून चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान यावर आता स्वतः आमदार सुनील शेळके यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून त्यांनी खासदार संजय राऊत यांनाच चॅलेंज दिले आहे.
संजय राऊतांनी पुरावे द्यावेत…
“खासदार संजय राऊत यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे केलेले हे आरोप निराधार आहे. कुंडमळा दुर्घटनेपासून ते सातत्याने माझ्यावर टीका करीत आहेत. परंतु आतापर्यंत त्यांनी केलेल्या कुठल्याही आरोपाला कुठलाही आधार नव्हता, की कुठला पुरावा त्यांनी जनतेसमोर ठेवलेला नाही. आज त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून मी शासनाचे हजारो कोटी रुपये बुडवल्याचे म्हटले आहे. माझे खासदार संजय राऊत यांना खुले आव्हान आहे की, त्यांनी मी शासनाचे एक हजार कोटी बुडविल्याचे पुरावे जनतेसमोर द्यावेत.’
पुढे बोलताना आमदार शेळके म्हणाले, ‘माझ्या मावळच्या जनतेच्या मनात माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा पोरकट प्रयत्न राऊत करताहेत. परंतु मावळची आणि महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे राऊतांच्या टीकेकडे मी फारसे लक्ष देत नाही.” अशी प्रतिक्रिया आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे.
मावळचे आमदार सुनील शेळके यांनी मावळ तालुक्यातील मौजे आंबळे हद्दीत बेकायदा उत्खनन केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी खासदार राऊत यांनी, आमदार सुनील शेळके हे मावळच्या जनतेला पैसे देऊन आमदार बनल्याचा आरोप केला होता. परंतु आतापर्यंत आरोप करण्यापलीकडे खासदार राऊतांनी काहीही केले नसून कुठलाही पुरावा दिलेला नाही, त्यामुळे आमदार शेळके यांनी राऊतांना थेट पुरावे देण्याचे आव्हान केले आहे. त्यामुळे आता आमदार सुनील शेळके यांचे हे चॅलेंज खासदार संजय राऊत स्वीकारणार का, ते पाहावे लागेल.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनील शेळके यांनी शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली ! खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप, थेट मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
– पवन मावळात पावसाचा जोर वाढला, पवना धरण 66 टक्के भरले ! गतवर्षीपेक्षा 48 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा । Pawana Dam Updates
– VIDEO : कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल… लातूर जिल्ह्यातील वृद्ध शेतकरी आजीआजोबांचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ