Dainik Maval News : जगद्गुरू संत तुकाराम महाराज 340व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे येत्या 18 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. यानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी नुकतीच श्रीक्षेत्र देहूगाव येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी देहू देवस्थानचे अध्यक्ष विश्वस्त यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
- पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत वारीनिमित्त भक्ती-शक्ती येथून पालखी सोहळा आकुर्डीकडे मुक्कामी जात असताना पालखी सोहळा एका बाजूने, तर काही वारकरी भाविकभक्त दुसर्या बाजूने चालत जात असतात. त्यांना कुठे अडचण होऊ नये, यासाठी रेल्वे मेट्रोचे सुरू असलेले काम आठ दिवस बंद ठेवावे, अशी मागणी केली आहे.
तसेच, संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यादिवशी महाद्वारातून 395 दिंड्यांना प्रवेश द्यावा. या दिंड्या वारकरी भाविक भक्त प्रदक्षिणा घालून नारायण महाराज समाधीकडील दरवाजावाटे बाहेर पडतील. या वेळी भाविकांना दर्शन घेता यावे, यासाठी दर्शनबारीतून मुखदर्शन घेता येईल, अशी व्यवस्था करावी.
- संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाल्यानंतर हा पालखी सोहळा पहिल्या मुक्कामासाठी इनामदार साहेब वाड्यात येत असतो. या इनामदारसाहेब वाड्याचे प्रवेशद्वार अतिशय लहान आकाराचे आहे. या ठिकाणी भाविकभक्तांची गर्दी होत असते. या गर्दीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
परंपरेनुसार पालखी सोहळा इनामदारसाहेब वाडा येथून निघाल्यानंतर पहिल्या समाज आरतीसाठी अनगडशाहबाबा दर्गा या ठिकाणी थांबत असतो. त्यामुळे या ठिकाणी दर्शनासाठी स्थानिक ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या गर्दीवर नियंत्र ठेवणे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी पोलिस प्रशासनाने घ्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
‘या’ दिवशी वाहतूक बंद ठेवावी
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा इनामदारसाहेब वाड्यातून 19 जून रोजी सकाळी लाखो वारकरी भाविकभक्तांच्या उपस्थितीत मार्गस्थ होणार आहे. या दिवशी निगडी ते देहूरोड आणि देहूरोड ते देहू या मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक बंद ठेवावी; जेणेकरून वारकरी भाविकभक्तांना पायी प्रवास करताना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. अशा प्रकारे देहू देवस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त व पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्यात चर्चा होऊन विश्वस्तांनी वरील मागण्या केल्या.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे मिसिंग लिंकबाबत नवीन डेडलाइन ! ‘या’ महिन्याच्या अखेरपर्यंत काम पूर्ण होणार ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
– आनंदाची बातमी ! मावळ तालुक्यातील २४ शाळा बनणार ‘आदर्श शाळा’ ; २० कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर
– वारकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार, वारीतील सहभागी वाहनांना टोल माफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

