Dainik Maval News : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशकोत्तर अमृत महोत्सव 375 वर्षपूर्ती सांगता अर्थात 376 वा बीज सोहळा रविवारी (दि.16 मार्च) श्रीक्षेत्र देहू येथे अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडला. देशभरातून व राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी बीज सोहळ्यात सहभागी होत संत तुकाराम महाराज चरणी नतमस्तक होऊन समाधान व्यक्त केले.
फाल्गुन वद्य द्वितीया सदेह वैकुंठगमन दिन अर्थात बीज सोहळ्यासाठी रविवारी गोपाळपूरा येथील वैकुंठगमन मंदिराच्या आवारात दुपारी सव्वा बारा वाजता राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो भाविक भक्त, भाविकांनी मनोभावे अभिवादन करीत नांदुरकीच्या वृक्षावर बुक्का, तुळशी -पानफुले उधळण करीत हा सोहळा पहायला मिळाल्याने जीवन धन्य झाल्याची भावना व्यक्त करीत माघारी फिरले.
- श्री संत तुकाराम महाराज मुख्य मंदिरात व बीज सोहळ्याच्या धार्मिक कार्यक्रमाला पहाटे तीन वाजल्यापासून काकड आरतीने सुरुवात झाली. श्री वैकुंठगमण मंदिरातील श्री संत तुकाराम महाराजांची महापूजा करण्यात आली. सकाळी मंदिरातील सर्व विधीवत पूजा उरकल्यानंतर सकाळी पावणे अकराच्या सुमारास “पुंडलिका वरदा हरि विठ्ठल” नामाचा जयघोष करीत पालखी मुख्य मंदिराच्या महाद्वारातून बाहेर पडली व मोठ्या लवाजम्यासह पालखीचे मुख्यमंदिरातून वैकुंठगमण मंदिराकडे प्रस्थान झाले.
पालखी बाराच्या सुमारास वैकुंठगमन मंदिराच्या आवारात प्रदक्षिणा घालून येथील नांदुरकीच्या वृक्षाखालीआली. येथे देहूकर महाराज यांचे श्री संत तुकाराम महाराजांच्या वैंकुठगमण प्रसंगावरील घोटवीन लाळ, ब्रम्हज्ञानी हाती । मुक्त आत्मस्थिती सोडविन ।। या अभंगावर कीर्तन सुरू होते. कीर्तन संपल्यावर दुपारी सव्वाबारा वाजता “बोला पुंडलिका वरदा हरि विठ्ठल” असा हरिनामाचा व श्री संत तुकाराम महाराजांच्या नामाचा गजर करीत भाविकांनी नांदुरकीच्या झाडावर पुष्पवृष्टी केली. हरिनामाचा गजर झाल्या बरोबर भाविकांनी दोन्ही हात जोडून महाराजांचे सदेह वैकुठगमण प्रसंगाची प्रत्यक्ष अनुभूती घेतली.
- मुख्य कार्यक्रम संपल्यानंतर पालखी पुन्हा मुख्य मंदिराकडे परतली. यावेळी हजारो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. बीजोत्सोव सोहळा पार पडल्यानंतर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
श्रीक्षेत्र भंडारा डोंगर देवस्थानच्या वतीने तीर्थक्षेत्र देहूतील मुख्य मंदिर, वैकुंठगमन मंदिर, गाथा मंदिर, संत तुकोबारायांचे ध्यान ठिकाण असणारे भामचंद्र डोंगर, घोरावडेश्वर डोंगर आणि भंडारा डोंगर या ठिकाणी हेलिकॉप्टरने तीन फेऱ्या पूर्ण करीत पुष्पवृष्टी करण्यात आली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक : छाननीत पाच अर्ज बाद, 195 अर्ज वैध
– मावळात जेई लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्धार ; 1 वर्षे ते 15 वर्षे वयोगटातील बालकांचे केले जाणार लसीकरण । Maval News
– मावळातील पुणे ग्रामीण पोलीस दलाची ‘ती’ चार ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयास जोडण्यास गृह विभागाचा नकार ? । Maval News