Dainik Maval News : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासद मतदार यादीबाबत संचालक माउली दाभाडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात हरकत घेत याचिका दाखल केली होती. ती याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली असून या निर्णयामुळे जिल्हा सहकारी निवडणूक प्राधिकरणाने संत तुकाराम कारखान्याच्या संचालक निवडीसाठी तयार केलेल्या मतदार यादीला आता अंतिम स्वरूप आले आहे. यासह कारखान्याच्या निवडणुकीचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे.
मुळशी, मावळ, खेड, हवेली आणि शिरूर या पाच तालुक्यात श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. पाचही तालुक्यात या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात 22 हजार 917 सभासद आहेत. गतवर्षी 31 डिसेंबरला या कारखान्याच्या संचालकांच्या पंचवार्षिक निवडीचा कालावधी संपला होता. परंतु, शासनाकडून निवडणुका पुढे ढकलण्याचे आदेश देण्यात आले होते. दिनांक 6 जानेवारीला निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या. त्यानुसार जिल्हा सहकारी निवडणूक प्राधिकरण तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी 17 जानेवारीला कारखान्याची प्रारूप सभासद मतदार यादी तयार केली.
- जिल्हा सहकारी निवडणूक प्राधिकरणाने तयार केलेल्या या सभासद मतदार यादीला कारखान्याचे संचालक व माजी उपाध्यक्ष माउली दाभाडे यांनी हरकत घेतली. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात मतदार यादीविरोधात याचिका दाखल केली होती. शेअर्स पूर्ण न झालेल्या आणि ऊस न घातलेल्या सभासदांची नावे मतदार यादीतून वगळावी, यासाठी त्यांनी ही याचिका दाखल केली होती.
मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही बाजू तपासल्या. दोन्ही बाजूंच्या पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यावेळी एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर उच्च न्यायालयाला निवडणुकीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करणे न्याय्य ठरणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल देत उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने दाभाडे यांचे अपील फेटाळले. त्यामुळे 14 फेब्रुवारीला या कारखान्याची अंतिम सभासद मतदार यादी प्रसिद्ध झाली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा