Dainik Maval News : छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र ऐतिहासिक पुराव्यासह जगासमोर मांडणाऱ्या व्यासंगी इतिहास संशोधक, मार्गदर्शकाला महाराष्ट्र मुकला आहे. ही इतिहास संशोधन क्षेत्राची मोठी हानी आहे, अशा भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
व्यासंग आणि अभ्यासातून त्यांनी शिवाजी महाराज आणि स्वराज्याविषयी अमुल्य अशी ग्रंथसंपदा निर्माण केली आहे. त्यामुळे ते शिवचरित्रकार म्हणून अजरामर राहतील, असेही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी नमूद केले आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, युद्ध पत्रकार ते भारत इतिहास संशोधन मंडळात प्रवेश आणि पुढे युद्धशास्त्राचा अभ्यासक, इतिहास संशोधक म्हणून मेहेंदळे यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी असा राहिला. त्यांनी शिवकालीन इतिहास सप्रमाण मांडला. त्यांची ही संशोधन साधना, वैविध्यपूर्ण लेखन आणि सिद्ध झालेली ग्रंथसंपदा ही जगासाठी अमूल्य असा ठेवा आहे. त्यांचे शिवप्रेमींसह, पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी मौलिक कार्य आहे.
शिवाजी महाराजांच्या चरित्राच्या सखोल अभ्यासासाठी ते मोडी लिपी बरोबरच फारसी, उर्दू, जर्मन, फ्रेंच, पोर्तुगीज अशा भाषा शिकले. संदर्भ मिळविण्यासाठी, अभ्यासकांशी चर्चेसाठी ते भारतभर फिरले. यातून ‘Shivaji his Life and Times’ हा इंग्रजी तर ‘श्री राजा शिवछत्रपती’ या मराठी ग्रंथांची निर्मिती झाली.
‘शिवछत्रपतींचे आरमार’, ‘आदिलशाही फर्माने’ या पुस्तकांमुळे अनेक ऐतिहासिक संदर्भ आपल्याला मिळाले. मेहेंदळे अनेकविध संस्थांचे मार्गदर्शक म्हणूनही महत्वाची भूमिका बजावत होते. इतिहास संशोधनाला अखंडपणे वाहून घेतलेल्या या मार्गदर्शक, व्यासंगी शिवचरित्रकाराचे निधन ही मोठी हानी आहे.
मेहेंदळे यांच्या निधनामुळे या क्षेत्रात पोकळी जाणवत राहील. त्यांच्या जाण्याने मेहेंदळे कुटुंबियांवर, त्यांचे संशोधक सहकारी, विद्यार्थी यांच्यावर दुःखाचा आघात झाला आहे. या सर्वांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. ज्येष्ठ इतिहास संशोधक, शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांच्या आत्म्यास सद्गती लाभो अशी प्रार्थना करतो, असेही मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मंत्री भेट देणार म्हणून एक दिवसापुरती बसस्थानकाची स्वच्छता करू नका ; लोणावळा भेटीत परिवहन मंत्र्यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान । Lonavala News
– मावळच्या राजकारणातील सर्वात मोठे पक्षांतर ! काँग्रेस, राष्ट्रवादीसह अनेक पक्षांना खिंडार ; बापूसाहेब भेगडे यांच्या शेकडो समर्थकांचा भाजपात प्रवेश
– मोठी बातमी ! शिवसेना जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर, तर मावळ तालुकाप्रमुखपदी राम सावंत यांची नियुक्ती । Maval Taluka Shiv Sena