Dainik Maval News : तळेगाव स्टेशन येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महिला वाहतूक पोलीस ज्योती सोनवणे बुधवारी सायंकाळी वाहतूक नियोजन करीत होत्या. चौकात बराच वेळ एक लहान मुलगी एकसारखी रडत होती. तिला घ्यायला तिचे पालक येत नव्हते. त्यामुळे ज्योती सोनवणे यांनी मुलीकडे जाऊन तिला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली. मुलीने तिचे नाव प्राची चव्हाण, गाव कातवी, शाळा जिल्हा परिषद शाळा वराळे असे सांगितले. सोनवणे यांनी मुलीला शांत केले.
प्राचीबाबत सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस यांना माहिती दिली. सोशल मीडियावर प्राचीचा फोटो आणि माहिती पाठविण्यात आली. डोळस यांनी ती माहिती वराळे येथील लोकांच्या सोशल मीडिया ग्रुपवर पाठवली. काही वेळेत मुलीची ओळख पटविणारे फोन आले. महिला पोलीस ज्योती सोनवणे, वॉर्डन भोसले आणि मुलीला घेऊन दिलीप डोळस वराळे गावात गेले. घरासमोर गेल्यानंतर प्राचीने आई-वडिलांना ओळखले. ओळखीची खातरजमा करून प्राचीला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
प्राची जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकते. बुधवारी शाळेतून घरी आल्यानंतर घरात तिच्या आई-वडिलांचे भांडण सुरु होते. भांडणाला घाबरून प्राचीने घराबाहेर पळ काढला. प्राची रडत रडत घरापासून सुमारे चार ते पाच किलोमीटर तळेगाव स्टेशन येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत आली. तसेच आलेला रस्ता देखील ती विसरली होती. दरम्यान, ज्योती सोनवणे यांनी तत्परता दाखवून तिला तिच्या घरी पोहोचवले.
लहान मुलांवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला हवे. मुलांच्या मनावर वाईट परिणाम होईल असे वर्तन पालकांनी मुलांसमोर करू नये. सुदैवाने प्राचीचे पालक लवकर मिळाले. पालकांची खातरजमा करून मुलीला पालकांच्या ताब्यात दिले आहे. – ज्योती सोनवणे, पोलीस अंमलदार, तळेगाव वाहतूक विभाग
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ महत्वाच्या चौकांमध्ये उड्डाणपूल उभारणे गरजेचे ; आमदार सुनिल शेळके यांची अधिवेशनात मागणी
– मोठी बातमी : पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला मिळणार गती । Pune – Lonavala Local
– मावळातील शेतकऱ्यांची भात भरडण्यासाठी लगबग ; इंद्रायणी तांदुळाला सर्वोत्तम दराची अपेक्षा । Maval News