“मनेश गोरख जठार (मु.पो.लोणी व्यकंनाथ, ता-श्रीगोंदा, जि-अहमदनगर) दिनांक 11 जानेवारी 2023 पासून घरामधुन बेपत्ता आहे. त्याची गाडी आणि शेवटचे लोकेशन नाणे घाट मध्ये 12 जानेवारी रोजी मिळाले आहे. पोलिसांनी नाणेघाटातील सर्व ठिकाणी स्वतः आणि वेगवेगळ्या ट्रेकिंग ग्रुप मार्फत शोध घेतला आहे. परंतू कुठल्याही प्रकारची ठोस माहिती मिळालेली नाही. दिनांक 18 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता आमदार अतुल बेनके यांच्या ऑफिसमधून शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा यांच्याकडे मदतीसाठी फोन आला. हरवलेल्या मुलांचे नातेवाईक पण बरोबर होते. ( Shivdurg Mitra Mandal Team Lonavla Succeeded In Finding Body Of Youth Who Had Fallen Into 1200 Feet Deep Gorge At Naneghat Junnar )
त्यावर आता दुपार नंतर जाऊन उशीर होणार आणि काम होणार नाही, म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी 19 जानेवारी रोजी लवकर पोहचून शोध मोहिम करु, असे सांगितले. रात्री सर्व साहित्याची जमवाजमव केली. टॉर्च, वॉकीटॉकी, कॅमेरा चार्ज करुन ठेवले, टेक्नीकल आणि साहित्य व बॉडी पॅकिंगसाठीचे साहित्य बरोबर घेतले. सकाळी 5.30 ला टीम जुन्नरच्या दिशेने निघाली. साडेतीन तासाचा प्रवास होता, त्याप्रमाणे पोचलो.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रात्री नातेवाईकांनी फोन केला होता खरंच तुम्ही 8-9 वाजता येणार का? अशी खात्री केली होती. साहजिकच आहे आठ दिवस शोधाशोध केल्यावर अशी प्रतिक्रिया येऊ शकते. नाष्टा करून जागेवर पोहोचलो. नातेवाईक बरोबरच होते. बोलता बोलता केस संदर्भातील सर्व चर्चा केली. गाडी कुठे सापडली, काही सीसी टीव्ही फुटेज पाहिले आणि संशयास्पद जागेची पाहणी करण्यासाठी विरुद्ध दिशेला दुर्बिण घेऊन टीम पाठवली. दुसरा गट कुठे कुठे शोध घेतला आणि काय साहित्य सापडले यावरुन एक जागा निश्चित केली आणि कामाला सुरुवात झाली, साधारणपणे 9.30 वाजता.
साहित्य काढणे वॉकीचे चॅनल सेट करणे, ॲंकर पॉईंट फिक्स करणे आणि खाली कोण उतरणार, वर कोण थांबणार, कुणी काय करायचे सर्व ठरले. खाली जाणारा आणि वर थांबून पाण्याची व्यवस्था करणारा यांच्या कामाला सारखेच महत्त्व असते. त्यामुळे ते लीडर ठरवतात कोणी काय करायचे आहे. काम चालू झाले. सुरवातीला योगेश उंबरे एक हजार फुट खाली दरीमध्ये रॅपलींग करुन गेला. नंतर सिध्दार्थ आढाव मदतीला गेला. संशयास्पद वाटणाऱ्या खाणा खुणा शोधल्या जे स्पष्ट पांढऱ्या रंगाचे दिसत होते, ती बॉडी नव्हती. पण जवळच एक मार्क होता त्याला फॉलो केल्यामुळे एक काळी पॅन्ट आणि ओळखपत्र सापडले आणि तपासाला दिशा मिळाली.
जी पॅन्ट मिळाली ती या मुलाचीच होती खात्री झाली. मग वास यायला लागला पण बॉडी दिसत नव्हती थोडे अजून शोधाशोध केल्यावर त्याच लाईनमध्ये खाली शर्ट सापडला आणि नंतर बॉडी दिसू लागली. साधारणपणे दुपारी 12 वाजता वाजता. पण रोप कमी असल्यामुळे तिथपर्यंत जाता येत नव्हते. नवीन ठिकाणी अशा शोध मोहिमा करताना लूज रॉक मूळे अपघात होतात. आपल्या अजूबाजूने मोठ मोठे दगड गोटे जातात. बॉर्डरवरील युध्दासारखा प्रसंग असतो. आपला जीवही वाचवायचा असतो, त्याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे.
आता पोलीस अधिकारी यांची परवानगी घेऊन बॉडी वर घ्यायची होती. बॉडी पॅकिंगसाठी मेडीकल ग्लोज, प्लास्टिक, स्ट्रेचर ,रोप, खाणे पिणे साहित्य हे सर्व घेऊन रतनसिंग याला खाली पाठवले. बॉडी खाली गावात घेऊन जाता येईल का? की वर खेचून घेणे सोपे जाईल यावर स्थानिक लोकांशी चर्चा केली आणि अंतर मोठे असल्याने दोन टप्प्यांत वर ओढून घेण्याचे ठरले. सगळी जुळवाजुळव करुन अथक परिश्रमाने बॉडी ठिक 4 वाजता वर आणली. ( Shivdurg Mitra Mandal Team Lonavla Succeeded In Finding Body Of Youth Who Had Fallen Into 1200 Feet Deep Gorge At Naneghat Junnar )
त्यानंतर सेटअप काढणे, रोप कॉईल करणे, खाली गेलेली टीम परत सुखरूप वर येणे याला साडेपाच वाजले. टीमचे सर्व जण सहा वाजता एकत्र जेवण करून परतीच्या प्रवासाला लागलो. बॉडी खेचून घेण्यासाठी स्थानिक नागरिक, मृताचे नातेवाईक, पोलीस, अधिकारी आणि टीमचे मोलाचे सहकार्य लाभले. शिवदुर्गची टीम योगेश उंबरे, महेश मसने, सिध्दार्थ आढाव, समीर जोशी, रतन सिंग, सिध्देश निसाळ अमोल सुतार, अनिल आंद्रे, सागर कुंभार आणि सुनिल गायकवाड, स्थानिक जुन्नर चे प्रशांत कबाडी, साईनाथ कबाडी, संतोष कबाडी यांनी मोलाचे सहकार्य केले.”
अधिक वाचा –
– प्राणीमित्रांनी घडवली आई आणि पिल्लांची भेट; बाथरुममध्ये अडकलेल्या उदमांजराच्या पिल्लांची सुटका – पाहा व्हिडिओ
– मावळ तालुक्यातील अतिदुर्गम तुंग गावात डिजीटल साक्षरता प्रशिक्षण शिबिर
– महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या मावळमधील पैलवानांच्या पाठीवर आमदार शेळकेंची कौतुकाची थाप