Dainik Maval News : चाकण येथील सुर्यकांत रामदयाल प्रजापती (वय 27) हा युवक बुधवारी (दि. 9 ऑक्टोबर) रोजी दुपारी 1.00 वाजता घरातून बाहेर पडला, परंतु तो घरी परतलाच नाही. त्यामुळे नातेवाईकांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 ऑक्टोबरला चाकण पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याचे रेकॉर्ड तपासणे, डिटेल्स काढण्यात आले, तेव्हा शेवटचे लोकेशन लोणावळा हे दिसत होते. त्यानंतर त्याचा लोणावळ्यात शोध सुरू झाला.
पोलीस यंत्रणा कार्यरत झाली. शुक्रवार, दिनांक 11 ऑक्टोबर रोजी चाकण पोलीस स्टेशनचे काही पोलीस कर्मचारी लोणावळ्यात आले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार लायन्स पॉईंटचा एक व्हिडिओ त्यांच्याकडे आहे. तो चेक करायचा आहे व ड्रोनच्या सहाय्याने काही होईल का? अशी विचारणा त्यांनी शिवदुर्ग रेस्कू टीम लोणावळा यांच्याकडे केली. परंतु त्या दोन तीन दिवसांत लोणावळ्यात खुप पाऊस व धूके होते, त्यामुळे ड्रोनच्या साहाय्याने शोध घेणे सोपे नव्हते.
रविवारी, दिनांक 13 ऑक्टोबर रोजी खोपोली येथील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या टीमचे प्रमुख गुरुनाथ साठिलकर यांचा शिवदुर्ग टीमला फोन आला आणि त्यांनी तो दोन सेकंदाचा व्हिडिओ पाठवला. तो व्हिडिओ रेस्कू ग्रुपमध्ये पाठवला असता, लोकेशन कुठे वाटते म्हणून विचारले तर अनेकांनी ते राजमाची गार्डन खंडाळा घाटाजवळ वाटतंय असे सांगितले. मंगळवारी, दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सुर्यकांत प्रजापतीचा छोटा भाऊ, मामा व मित्र शोध मोहीमेसाठी आले होते. त्यांनी स्वतः लोकेशन शोधाशोध करून संध्याकाळी शिवदुर्ग टीमला फोन केला.
राजमाची गार्डनच्या लोकेशन वर जाऊन ते आले होते व एक गोष्ट त्यांनी नोटीस केली की मागचा बॅकग्राऊंड मध्ये काही गोष्टी सेम टू सेम दिसत आहे. शिवदुर्गला देखील हाच संयश होता. त्यानंतर या एक कॉल रेकॉर्डिंग वरुन लगेचच शोध मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला व दूसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी (दि.16) सकाळी सकाळी नऊ वाजता शोध चालू झाला.
लोकेशन व व्हिडिओ जरी मिळाला तरी योग्य ती जागा सापडणे महत्वाचे असते, त्यात कौशल्य दाखवणे आवश्यक असते. बऱ्याचवेळा फोन टाकून देऊन किंवा मिसगाईड करायचे प्रकार होत असतात. सर्व टिमने यावर एकत्र येऊन चर्चा केली व एक जागा निवडली आणि तीच फायनल जागा होती. सेटअप तयार केला गेला. सदस्य योगेश उंबरे खाली जाऊन शोध घेऊ लागले आणि पहिल्या वीस पंचवीस फुटांवर त्यांना मोबाईल फोन दिसला. तेव्हा खात्री झाली की शोधण्यासाठी ठिकाण योग्य निवडले आहे.
हळू हळू योगेश खाली जाऊ लागले, तिनशे फुट खाली गेल्यावर थोडा कुजट वास आला व खाली अजून साठ सत्तर फुट मृतदेह सदृश काही तरी नजरेस पडले. मग अजून खाली जाऊन खात्री केली आणि मृतदेह सापडला आहे असा निरोप त्यांनी वर असलेल्यांना दिला. म्हणजे एकुण 370 फुटांपेक्षा जास्त खोल मृतदेह आढळला होता. आदित्य पिलाने आणि रोहित वर्तक या दोघा सदस्यांना इतर साहित्य घेऊन मदतीसाठी खाली पाठविण्यात आले.
मृतदेह पॅकींग साठी स्ट्रेचर व इतर ग्लोब्ज साहित्य घेऊन सुरक्षासाधनासह दोघे एका मागोमाग एक खाली गेले. वॉकी वर अपडेट चालू होते. सुचना चालू होत्या. त्यावेळी वर करण वरे ,सागर कुंभार यांनी सिनीअरच्या सल्ल्याने सेटअप रेडी केला व खालची टीम आणि वरची टीम यांनी एकमेकाशी संवाद साधून मृतदेह हळूहळू वर खेचायला सुरुवात केली.
अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टीमचे सर्वेसर्वा गुरुनाथ साठीलकर हेही सहकाऱ्यांसोबत मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले होते. दोन्ही टीमने मिळून मृतदेह दुपारी साडेबारा वाजता वर घेतला आणि पुढील कारवाईसाठी पोलीस व नातेवाईकांना सूपूर्त केला.
या कठीण अशा शोध मोहिमेत योगेश उंबरे, रोहीत वर्तक, आदित्य पिलाने, राजेंद्र कडू, महेश मसणे, सुनिल गायकवाड, आनंद गावडे, अनिल सुतार, कपिल दळवी, करण वरे, सांगर कुंभार, सागर दळवी, दिनेश पवार, शिवराज गायकवाड, प्रिंस बैठा, समिर देशमुख, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्था खोपोली गुरुनाथ साठेलकर, महेश भोसले, धर्मा पाटील हे सर्वजण सहभागी झाले होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचं बिगुल वाजलं : 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला मतमोजणी, आजपासून आचारसंहिता लागू । Maharashtra Vidhansabha Election
– मोठी बातमी ! दुपारी 12 वाजता होणार राज्यपाल नियुक्त सात आमदारांचा शपथविधी, ‘हे’ 7 जण बनणार आमदार
– तळेगावमधील कुंभारवाडा परिसराचे नामकरण श्री संत गोरोबाकाका नगर असे करण्याची मागणी । Talegaon Dabhade