Dainik Maval News : मावळ तालुक्यातील पवन मावळ विभाग हा डोंगर दऱ्यांचा आणि अतिपावसाचा भाग म्हणून प्रसिद्ध आहे. यामुळे याठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक ये-जा करीत असतात. पर्यटकांचा ओढा लक्षात घेता ग्रामीण भागात काणाकोपऱ्यात रस्ते व्हावेत, यासाठी लोकप्रतिनी आणि शासन प्रयत्नशील आहे. पवन मावळातील ठाकुरसाई ते जवण हा रस्ता स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर प्रथमच पक्का करण्यात आला. त्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून सहा किलोमीटर करिता सहा कोटीचा निधी उपलब्ध झाला होता. परंतु अवघ्या सहा महिन्यापूर्वी पुर्णत्वास गेलेला हा रस्ता आता जागोजागी उखडला असून वाहतुकीस धोकादायक बनला आहे. खड्डे पडण्यासोबत रस्त्यातील भ्रष्टाचार देखील उघडा पडला असून या भागातील नागरिक यामुळे त्रस्त आणि संतप्त झाले आहेत.
बुधवारी (दि. ८ ऑक्टोबर ) रोजी माध्यमांत हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर खडबडून जागे झालेले संबंधित विभागाचे अधिकारी आणि रस्ता बनविणाऱ्या कंपनीचे ठेकेदार हे प्रत्यक्ष पाहणीसाठी याठिकाणी आले. परंतु अधिकारी – ठेकेदार आले असल्याचे लक्षात येताच या मार्गावरील गावांतील ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ, स्थानिक प्रतिनिधी त्याठिकाणी आले. ग्रामस्थांनी अधिकारी आणि ठेकेदार यांच्या समोरच रस्त्याच्या कामाची पोलखोल केली. सोबत रस्त्यावरील कामाचा दर्जा दाखवून जाबसाल केला. यावेळी क्रोधित ग्रामस्थांनी आगळ्यावेगळ्या प्रकारे ह्या भ्रष्ट कारभाराचा निषेध नोंदवित उपस्थित अधिकारी – कर्मचारी यांचा सन्मान केला.
हा उपहासात्मक सन्मान स्वीकारताना अधिकारी – कर्मचारी यांनाही कर्तव्यातील कसूर आणि कामातील भ्रष्टपणा याची नक्कीच जाणीव झाली असावी. ग्रामस्थांच्या आग्रहास्तव प्रत्यक्ष रस्ता बनविणाऱ्या कंपनीतील प्रमुखांना संपर्क करून त्यांना याठिकाणी येण्याचे आणि प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच, जागोजागी रस्ता उखडून बनलेले खड्डे न भरता पुन्हा संपूर्ण रस्ता करून देण्यात यावा अन्यथा अधिकारी – ठेकेदार यांना पाय ठेऊ न देण्याचा तसेच तीव्र विरोध करण्याचा निर्धार यावेळी बोलून दाखविण्यात आला. यासह जनतेच्या पैशाची माती करणाऱ्या भ्रष्ट ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी करण्यात आली.
याप्रसंगी रस्ता पाहणीसाठी उप अभियंता रोहीत कट्टे, उप अभियंता निशिकांत आंबेगावकर, शाखा अभियंता, ठेकेदार उपस्थित होते. यासह ग्रामस्थांमध्ये माजी सरपंच नारायण बोडके, माजी सरपंच नितीन लायगुडे, किसन खैरे, भगवान भिकोले, संजय मोहोळ, दत्तात्रय ठाकर, भाऊ बोडके, हरिश्चंद्र पासलकर, शंकर भोसले, बंडु खैरे, सदाशिव भोसले, तुकाराम खैरे आदी उपस्थित होते.
पंधरा ऑक्टोबर पासून रस्त्याच्या दुरूस्ती कामाला सुरूवात होणार आहे. त्यापूर्वी रस्त्याची पाहणी केली जाईल. तसेच रस्ता बनविणाऱ्या ठेकेदाराकडे पाच वर्षे देखभालीचे काम असल्याने रस्ता ठेकेदाराकडून दुरूस्त करून घेतला जाईल. – निशिकांत आंबेगावकर, अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर रस्ता मंजूर झाला. सहा किलोमीटर करिता सहा कोटी रुपये उपलब्ध झाले. निधी मिळविण्यासाठी या भागातील सर्वच गावांतील नागरिकांनी कष्ट घेतले. परंतु ठेकेदाराचा भ्रष्टाचार आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे सहा कोटींची माती झाली. आता बनविलेला रस्ता जागोजागी उखडून खड्डेमय झालाय. आता हा रस्ता खड्डे बुजवून दुरुस्त न करीता संपूर्ण नव्याने करून द्यावा हीच आमची मागणी आहे. – नितीन लायगुडे, माजी सरपंच, जवण-अजिवली
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कोण होणार तुमच्या शहराचा नगराध्यक्ष? राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर – पाहा संपूर्ण यादी
– पुणे जिल्हा परिषद आणि 13 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी गट व गणनिहाय प्रारूप मतदार यादी बुधवारी प्रसिद्ध होणार
– लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि वडगाव मावळ, देहू नगरपंचायत नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर – पाहा एका क्लिकवर
