Dainik Maval News : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत प्रस्तावित इनर रिंग रोड प्रकल्पाला वेग देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या रिंग रोडसाठी 13 गावांतील 115 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. हा रिंग रोड पुणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यास मदत करणार असून, एकूण 83 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी 42,200 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
पीएमआरडीए ने अंतर्गत रिंग रोडसाठी भूसंपादनाची प्रक्रिया जलद करण्यासाठी 113 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातील 30 टक्के रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आली आहे. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संयुक्त सर्वेक्षण आणि जमिनीचे मूल्यांकन सुरू करण्यात आले आहे. या रिंग रोडसाठी खेड, हवेली, मुळशी आणि मावळ तालुक्यातील एकूण 44 गावांतील 743.41 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत 42 जोड रस्ते, 17 पूल आणि 10 बोगदे तयार केले जाणार असून, भविष्यातील मेट्रोसाठी 5 मीटर रुंदीची जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहे.
- रिंग रोडचा पहिला टप्पा सोलू ते वडगाव शिंदे असा असून यामुळे नगर रस्त्यावरची वाहतूक कोंडी कमी होणार आहे. या टप्प्यातील रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या बाह्य रिंग रोडला जोडला जाणार आहे. तसेच, आळंदी ते वाघोली या 6.5 किलोमीटर लांबीच्या भागासाठीही भूसंपादन सुरू झाले आहे.
या प्रकल्पाचा 5.7 किलोमीटर लांबीचा भाग पुणे महानगरपालिका हद्दीत येतो. हा रस्ता लोहगावमधून जाईल आणि पिंपरी-चिंचवड शहराशी जोडला जाणार आहे. हा भाग पुणे महापालिकेकडून विकसित करून नंतर पीएमआरडीए कडे हस्तांतरित केला जाणार आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर हा प्रकल्प उभारला जाणार आहे.
- बाह्य रिंग रोडची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी 15 नवीन इंटरचेंज उभारण्यात येणार आहेत, ज्यासाठी 145 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यातील 12 इंटरचेंज आधीच अस्तित्वात आहेत, तर 3 इंटरचेंज नव्याने उभारले जातील. हे इंटरचेंज मावळ, खेड, शिरूर, हवेली, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हा आणि मुळशी या नऊ तालुक्यांमधून जाणार आहेत.
भूसंपादनासाठी समाविष्ट गावांची यादी
वडाचीवाडी, भिलारेवाडी, पिसोळी, येवलेवाडी, मांगडेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, आंबेगाव खुर्द, निगरुडी, कदम वाकवस्ती, सोलू आणि वडगाव शिंदे.
पीएमआरडीए अधिकाऱ्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांशी चर्चा सुरू असून लवकरच मोजणी पूर्ण करून भूसंपादनाची प्रक्रिया पुढे नेली जाईल.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक : छाननीत पाच अर्ज बाद, 195 अर्ज वैध
– मावळात जेई लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्धार ; 1 वर्षे ते 15 वर्षे वयोगटातील बालकांचे केले जाणार लसीकरण । Maval News
– मावळातील पुणे ग्रामीण पोलीस दलाची ‘ती’ चार ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयास जोडण्यास गृह विभागाचा नकार ? । Maval News