Dainik Maval News : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात व्यवसायांमधील पारंपरिकपणा लोप पावला आहे. नवनवीन यंत्रे आले. पिढीजात व्यवसाय असतानाही नवीन पिढीने उच्च शिक्षणामुळे आपले व्यवसाय बदलले. चलन व्यवस्थाही बळकट झाल्याने पूर्वींची वस्तू रुपात होणारी देवाण-घेवाण बंद झाली. त्यामुळे गावखेड्यातील बारा बलुतेदार पद्धतही कालबाहा होण्याच्या मार्गावर आहे.
आपले राज्य हे शेतीप्रधान आहे. पूर्वी खेडेगावांमध्ये वस्तू विनिमय पद्धत अस्तित्वात होती. या पद्धतीच्या केंद्रस्थानी कुणबी म्हणजेच शेतकरी होता. शेतकरी हा धान्य पिकवत असे आणि जे शेतकरी नव्हते ते शेतकऱ्यांस व इतरांस सेवा पुरवित असत. त्यामध्ये जे शेतकऱ्यांच्या नेहमीच्या गरजा भागवत त्यांना बलुतेदार असे म्हणत. हेच गावगाड्याचे शिल्पकार होते. पिढ्यान पिढ्या तेच ठरावीक काम करत. त्यांच्यामाफत दैनंदिन व्यवहार होत असे.
आता मात्र पूर्वीसारखे राहिले नाही. बारा बलुतेदारांची जातीनुसार काम करणारी युवा पिढी आता नवयुगात शिक्षण, यंत्र, उद्योग व्यवसाय, आधुनिक तंत्रज्ञानामुळे इतर व्यवसाय व नोकरी करू लागली आहे. त्यामुळे वस्तूंची देवाण-घेवाण बंद होऊन बारा बलुतेदारी पद्धत बंद होणाच्या मार्गावर आहे.
कोण होते बारा बलुतेदार?
12 बलुतेदार – कुंभार समाज, न्हावी समाज, सोनार समाज, गोंधळी समाज, शिंपी समाज, गुरव समाज, सुतार समाज, मातंग समाज, परीट समाज, बौद्ध समाज, चर्मकार समाज, माळी समाज हे बारा बलुतेदार होते. त्यांना त्यांच्या जातीनुसार ठराविक कामे असे आणि हेच गावागाड्याचे शिल्पकार होते. (संदर्भ : तळेगाव दाभाडे इतिहास ते वर्तमान, ग्रंथ )
बलुतेदार व्यवस्था रूढ होती…
पूर्वी बलुतेदाराला जातीव्यवस्थेने स्थैर्य दिले होते. प्रत्येक जातीचा स्वतंत्र असा व्यवसाय होता व तो करणे त्यास बंधनकारक होते. त्याला तो नाकारता येत नसे. बलुतेदार व्यवस्थेने दीर्घकाळापर्यंत ग्रामीण समुदायाला आर्थिकदृष्ट्या स्वयंपुर्ण ठेवले व एकमेकांच्या गरजा भागविल्या. परंतू, सध्याचे औदयोगिकीकरण, दळणवळण प्रगत साधने, नागरिकीकरण, शिक्षणप्रसार, लोकशाही व्यवस्था, व्यवसायात आधुनिकीकरण, व्यवसाय स्वातंत्र्य, लोकसंख्यावाढ, मुद्राप्रधान व्यवस्था, सामाजिक जागृती यामुळे ह्या बलुतेदार पद्धतीत बदल घडून आला आहे.
शिवकाळातील मौजे अर्थात गाव हे गावगाडा पद्धतीने चालत असे. यात बलुतेदार व अलुतेदार दोन्ही महत्वपूर्ण घटक होते. मौजे प्रमुख म्हणून पाटील व त्याचा सहाय्यक कुलकर्णी असे. शिवकाळात मोठी वसलेली गावे गावगाडा पद्धतीने परंपरागत चालत होती. गुण्यागोविंदाने सर्व मंडळी एकत्र येऊन आपला चारितार्थ आपापल्या कलेच्या गुणवत्तेवर चालवीत असत. मध्ययुगात गावगाडा पद्धतीमुळे सर्व हातांना रोजगार होता तथा हमी देखील होती. म्हणून शिवकाळातील खेडी मीठ सोडता स्वयंपूर्ण होती. – डॉ. प्रमोद बोराडे, इतिहास संशोधक
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी ! विसर्जनानंतर गणेश मूर्तींचे छायाचित्रण व प्रसारणास मनाई ; पुणे शहर पोलीस उपआयुक्तांचा आदेश
– जी.एस.टी. कर कपातीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला मिळणार चालना ; पाहा कर कपातीमुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे
– महसूल विभाग १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान पाणंद रस्ते, सर्वांसाठी घरे योजनांच्या अंमलबजावणीसाठी ‘सेवा पंधरवडा’ राबविणार
