महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे 68 व 84 कलमानुसार अवैध मद्य विक्री करणाऱ्यांविरुद्ध तसेच अवैध ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध जिल्ह्यात 7 ते 9 जानेवारी दरम्यान विशेष मोहिम राबवून एकूण 29 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे कार्यालयाने दिली आहे. ( Special Campaign Against Illegal Liquor Sale And Alcohol Consumption In Pune District )
सदर कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर 25 आरोपींना दोषी ठरवण्यात आले असून न्यायालयाकडून या आरोपींना एकूण 37 हजार रुपये दंड करण्यात आला आहे. यापूर्वी सप्टेंबर 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये अशा प्रकारचे एकूण 35 गुन्हे नोंदवण्यात आले होते. त्यामधील एकूण 71 आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवून 1 लाख 27 हजार 800 रुपये इतका दंड करण्यात आला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच, अवैध मद्य निर्मिती वाहतूक व विक्रीचे समुळ उच्चाटण करण्यासोबतच गुन्हेगारांना वचक बसविण्याकरीता राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने चालू वर्षामध्ये 382 सराईत आरोपींकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर केलेले आहे. तसेच एमपीडीए अंतर्गत कारवाईसाठी एकूण 17 प्रस्ताव व मोक्काअंतर्गत 2 प्रस्ताव संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहेत. अधिक दराने मद्य विक्री करणारे दारु विक्री दुकान व देशी दारु बार अनुज्ञाप्तीधारकाविरुद्ध एकुण 10 विभागीय गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्यावतीने वर्ष 2021-22 पेक्षा वर्ष 2022-23 मध्ये एकूण नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये 435 ने वाढ झालेली आहे. तर अटक आरोपी संख्येमध्ये 596 ने वाढ झालेली आहे. जप्त वाहनांच्या संख्येत 72 ने वाढ झाली असून जप्त मुद्देमालाच्या किंमतीमध्ये 5 कोटी 86 लाख 40 हजार 662 रुपये इतकी वाढ झालेली आहे.
पुणे जिल्ह्यात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. कोणत्याही नागरिकास अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्रीबाबत माहिती मिळाल्यास टोल फ्री क्रमांक 18002339999 आणि दुरध्वनी क्रमांक 020-26058633 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंह राजपुत यांनी केले आहे.
अधिक वाचा –
– वडगाव रेल्वे प्लॅटफॉर्मवर आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह; पोलिसांकडून ओळख पटवण्याचे काम सुरु, वाचा सविस्तर
– प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी प्रमाणिकरण करण्याचे आवाहन