Dainik Maval News : काळ जसा बदलत गेला तशी विभक्त कुटुंब पद्धत वाढत गेली. पण एकत्र कुटुंब पध्दतीचे खूप फायदे आहेत त्याबद्दल तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करायाल हवी असे मत राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केले. लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबाग चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेतर्फे तळेगाव एमआयडीसी जवळ असेल्या आंबी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या ‘नव ताझ धाम’ या वृद्धाश्रमाचे उदघाटन रविवारी (दि.9) त्यांच्या हस्ते झाले.
यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबाग चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष फतेचंद रांका, सदर प्रकल्पाचे देणगीदार रुखशाना व मेहेर अंकलेसरिया, प्रकल्पासाठी देणगी स्वरूपात जमीन उपलब्ध करून देणारे सुधीर नाईक, लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबागचे प्रशांत कोठडिया, योगेश शाह, आशा ओसवाल, चैताली पटनी, अनिकेत आघाव, चेतक गुगळे व केअरिंग हँड्स संस्थेचे सचिव अंबादास चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
- सगळ्याच मुलांना आपले आई-वडील नकोसे असतात असे नाही. काही वेळेस, नोकरी, व्यवसाय, शिक्षण यामुळे आई वडिलांसोबत राहणे मुलांना शक्य होत नाही. अशा परीस्थितीत आपले आई वडील सुरक्षित अशा एखाद्या चांगल्या सुविधा असलेल्या वृद्धाश्रमात असले तर त्यांची नीट काळजी घेतली जाईल असा विश्वास मुलांना असतो. त्यामुळे चागल्या सोयी-सुविधा देणारे वृद्धाश्रम महत्वाचे ठरतात, असे मिसाळ म्हणाल्या.
काळ जसा बदलत गेला तसे कुटूंब पद्धतीमध्ये बदल होत गेले. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहण्याचे अनेक फायदे असतात, ते नव्या पिढीला माहित करून देऊन पुन्हा एकदा आपल्याला एकत्र कुटुंब पद्धतीकडे वळावे लागणार अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे मत देखील यावेळी माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केले.
एकत्र कुटुंब पद्धत असताना वृद्धाश्रमाची आवश्यकता नव्हती, पण वाढते नागरीकरण, बदलती संस्कृती यामुळे विभक्त कुटुंब पद्धत अस्तित्वात येत गेली. वृध्दाश्रम या संकल्पनेच्या आपण विरोधात आहोत. प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांना घडवण्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे वृद्धापकाळात आई-वडिलांची काळजी घेणे ही मुलांची जवाबदारी आहे. पण काळ बदलतो आहे, शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने मुलांना देश-विदेशात जावे लागत आहे, त्यामुळेच वृद्धाश्रम ही काळाची गरज बनली असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यावेळी म्हणाले.
केंद्रात सत्तेमध्ये असणारे मोदी सरकार, राज्यामध्ये असणारे महायुतीचे सरकार जेष्ठ नागरिकांना मदत होईल यादृष्टीने काही चांगल्या योजना राबवत आहे. त्याचबरोबर समाजातील अनेक लोक व सेवाभावी संस्था देखील पुढे येऊन जेष्ठ नागरिकांसाठी चांगले काम करत आहेत ही बाब महत्वाची असल्याचे बारणे यावेळी म्हणाले.
- एकत्र कुटुंब पद्धत कमी होत चालली असून विभक्त कुटूंब वाढत चालली आहेत. शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने मुले विदेशात जाऊ लागली आहेत, त्यामुळेच वृद्धाश्रम वाढू लागले आहेत. घरात कोणी नसेल तर ज्येष्ठ नागरिकांना ते घर खायला उठते, त्या चार भिंती नकोशा वाटू लागतात, त्यामुळे अशा व्यक्तीचे उर्वरित आयुष्य हे आनंदात आणि खेळीमेळीच्या वातावरणात जावे, या उद्देशाने ‘नव ताझ धाम’ या प्रकल्पाची उभारणी करण्यात आल्याचे फत्तेचंद राका यांनी सांगितले. देशात १३०० हून अधिक लायन्स क्लब आहेत त्यापैकी आमच्या क्लब ऑफ पुणे सारसबागने हाती घेतलेला हा सामाजिक प्रकल्प सर्वोत्तम असल्याचे रांका यांनी यावेळी नमूद केले.
देणगीदार रुक्शाना व मेहेर अंकलेसरिया या दाम्पत्याने नाव ताज धाम प्रकल्पाच्या उभारणीसाठी रुपये साडे चार कोटी इतकी देणगी दिली आहे. तसेच या प्रकल्पासाठी आपली जमीन देणगी स्वरुपात सुधीर नाईक यांनी उपलब्ध करून दिली असून जमिनीची किंमत सुमारे रुपये अडीच कोटी असल्याचे देखील रांका यांनी यावेळी नमूद केले.
समाजातील उपेक्षित, गरजू व्यक्तींना मदत व्हावी, या हेतूनेच नवताजधामची उभारणी करण्यात आली आहे. आपले वडील कै. नवल नरिमन व मातोश्री कै. ताझ नवल नरिमन यांच्या स्मरणार्थ ही इमारत बांधण्यात आली असल्याने या प्रकल्पास “नव ताझ धाम” असे नाव देण्यात आले असल्याचे रुखशाना मेहेर अंकलेसरिया यांनी सांगितले. उपक्रमाचे प्रास्ताविक फतेचंद रांका यांनी केले तर तुषार मेहता व जुली पटवा यांनी कार्याक्रमाचे सूत्रसंचालन केले.
फोटो ओळ – अंबी तळेगाव एमआयडीसी येथे साकारलेल्या ‘नव ताझ धाम’ या वृद्धाश्रमाचे उदघाटन करताना राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ. फोटोत डावीकडून फत्तेचंद रांका, अंबादास चव्हाण, माधुरी मिसाळ, श्रीरंग बारणे, रुखशाना व मेहेर अंकलेसरिया.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तुकडा बंदी कायद्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक ; प्रस्ताव सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश
– शेतात जाणारे रस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय
– पुणे ग्रामीण जिल्ह्यात 21 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू । Pune News