Dainik Maval News : मावळ विधानसभेची निवडणूक ही अत्यंत रंजक होणार असल्याचे दिसत आहे. आधीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उमेदवारी जाहीर झाल्यापासून दोन गट निर्माण झाले आहेत. अशात आता शरद पवार यांची एन्ट्री मावळच्या राजकारणात झाली असून शरद पवार यांनी अजित दादांना सोडून अपक्ष उमेदवारी जाहीर केलेले बापूसाहेब भेगडे यांना आपल्या पक्षाचा पाठींबा देण्याची जाहीर केले असल्याचे त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले आहे. त्यामुळे मावळच्या विधानसभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा काका शरद पवार आणि पुतणे अजित पवार हेच एकमेकांच्या समोर उभे ठाकल्याचे दिसत आहे.
मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार सुनिल शेळके यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे उमेदवारी मागत असलेले महायुतीतीलच दादा गटाचे बापूसाहेब भेगडे आणि भाजपाचे बाळा भेगडे, रविंद्र भेगडे हे नाराज झाले. सुनिल शेळके यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्याच्या काही तासात बापूसाहेब भेगडे यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला, तसेच आपण विधानसभा निवडणूक लढविणार आणि अपक्ष लढविणार असेही जाहीर केले. बापूसाहेब भेगडे यांच्या भुमिकेमुळे तालुक्याच्या राजकारणात नवा रंग भरला गेला. त्याच्या काही तासात नंतर लगेचच भाजपाने देखील पत्रकार परिषद घेतली. यात बाळा भेगडे यांनी त्यांच्या समर्थक सहकाऱ्यांनीही पक्षाच्या पदाचे राजीनामे दिले आणि आपण बापूसाहेब भेगडे यांचे काम करणार असल्याचे जाहीर केले. या घटनेमुळे सुनिल शेळके यांच्या विरोधात अनेक नेते एकवटलेले दिसून आले.
ह्या सर्व परिस्थितीत महाविकासआघाडीच्या गोटातून मात्र कोणतीही हालचाल दिसून आली नाही. सुनिल शेळके यांनी वारंवार महाविकासआघाडीकडे उमेदवार नसल्याचे आणि आमच्यातील नाराजवंताना ते गळाला लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आता महाविकासआघाडीच्या गोटातून तशाच घटना घडताना दिसत आहे. एकीकडे राज्यात बहुतांश जागांवर महाविकासआघाडीचे उमेदवार जाहीर झालेले असताना मावळच्या जागेचे मात्र कोणतेही चित्र स्पष्ट झालेले नाही. काँग्रेस आय पक्षाने येथे मविआचाच उमेदवार असले असे अनेकदा सांगितले. परंतु आता शरद पवार यांच्या पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या भूमिकेमुळे मविआचं नेमकं काय चाललंय? असा प्रश्न मावळकरांना पडला आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा बापूसाहेब भेगडेंना पाठींबा –
आम्हाला वरिष्ठांकडून काही सूचना आणि आदेश आले आहेत. त्यानुसार यंदाच्या विधानसभा निवडणूकीत शरदचंद्र पवार साहेब यांचा राष्ट्रवादी काँग्रस पक्ष मावळ विधानसभेत अपक्ष उमेदवार बापूआण्णा भेगडे यांचा प्रचार करेल. निवडणूकीत आमचा पाठींबा बापूआणण्णांना राहिल, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रेय पडवळ यांनी जाहीर केले. यामुळे तालुक्याच्या राजकारणाचा रंग बदलला असून आता बापू भेगडे यांना शरद पवार यांच्या पक्षाची ताकद मिळाल्याने मावळात काँटे की टक्कर पाहायला मिळेल, असे दिसत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात भात कापणीला सुरूवात ; परतीच्या पावसाने नुकसान झाल्याने उत्पादनात घट होण्याचा अंदाज
– दिवाळीसाठी बाजारपेठा सजल्या ; पणत्या, कंदील, फटाके आदी साहित्य खरेदीसाठी नागरिकांची लगबग । Diwali News
– धक्कादायक ! जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात लाखोंची फसवणूक, पैसे परत न देता ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी