Dainik Maval News : मावळ तालुक्यात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणूसकीला काळीमा फासणारी घटना बुधवारी (दि.२५) घडली आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने पाच वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करण्याचा गंभीर प्रकार केला आहे. याप्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर पोक्सो, ॲट्रासिटी व भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे त्याचे निलंबनही करण्यात आले आहे.
ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा शहर आणि ग्रामीण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. याकरिता पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून पोलीस ठाण्यांना अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. पुणे मुख्यालयातून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये बंदोबस्त कामासाठी आलेला पोलीस कर्मचारी सचिन वसंत सस्ते (वय ४३, सध्या रा. महंमदवाडी, हडपसर, पुणे. मूळ रा. जेजुरी, पुरंदर) हा बंदोबस्त कामी लोहगड विसापूर किल्ला परिसरात असताना त्याठिकाणी खेळत असलेल्या एका पाच वर्षाच्या अल्पवयीन मुलीला त्याने चॉकलेटचे आमिष दाखवत आडबाजूला घेऊन जात तिच्यासोबत दारूच्या नशेमध्ये अश्लील चाळे केले असल्याची तक्रार मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे.
याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरा लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायने हे करत आहेत. एका खाकी वर्दीतील पोलीस कर्मचाऱ्याने पाच वर्षांच्या चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघड झाल्याने सर्वांनी संताप व्यक्त केला आहे. ज्याला आपण रक्षक समजतो तोच भक्षक ठरल्याने न्याय मागायचा कोणाकडे असा संताप पीडित मुलीच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.पोलीस विभागाने आम्हाला न्याय मिळवून द्यावा. विकृत मानसिकता असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘अर्थशास्त्री’ हरपला.. देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, सर्व शासकीय कार्यक्रम रद्द, मनमोहन सिंग यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार । Dr Manmohan Singh Passes Away
– महाराष्ट्रात शुक्रवार – शनिवार दोन दिवस गारपीट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज ; सोमवारपासून थंडी वाढणार
– वाहनांचा अतिवेग वन्यप्राण्यांच्या जीवावर बेततोय… द्रुतगती मार्गावरील वन्यजीवांचे अपघात थांबविण्यासाठी उपाययोजना आवश्यक