Dainik Maval News : लोणावळा नगरपरिषद उपनगराध्यक्ष व नामनिर्देशित सदस्य पदासाठी मंगळवारी (दि. १३) निवडणूक होणार आहे. नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी उपनगराध्यक्ष व नामनिर्देशित सदस्यांच्या निवडीचा कार्यक्रम घोषित केला आहे. तर, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत देखील मंगळवारी उपनगराध्यक्ष व नामनिर्देशित सदस्य पदासाठी निवडणूक होणार आहे, नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनी याकरिता विशेष सभा बोलावली आहे.
लोणावळा –
लोणावळा नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वर्चस्व राखत विजय प्राप्त केला. तर भाजप चार, काँग्रेस तीन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक, अपक्ष तीन असे पक्षीय बलाबल आहे. उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी व भाजपकडूनही एक-एकजण इच्छुक आहे, किंवा महिला नगरसेविकेला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीकडून नगरपरिषद निवडणुकीच्या काळामध्ये अनेक स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली जाईल, असा शब्द देण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून दोन तर भाजपकडून एकाला स्वीकृत सदस्यपदी संधी मिळणार आहे. त्यापैकी प्रथम कोणाला संधी मिळते याकडे लक्ष आहे.
तळेगाव दाभाडे –
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांच्या युतीची सत्ता आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे सतरा अधिक एक अपक्षाचा पाठींबा असे अठराच बलाबल आहे. तर भाजपाचे दहा नगरसेवक आहे. पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा उपनगराध्यक्ष होईल, अशीच चिन्हे आहेत. तसेच स्वीकृत सदस्य म्हणून नक्की कुणाला पहिल्या टप्प्यात संधी मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक कार्यक्रम –
सकाळी १० ते १२ नामनिर्देशनपत्र स्वीकारणे, दुपारी १२ ते १२.१५ नामनिर्देशनपत्रांची छाननी, दुपारी १२.१५ ते १२.३० उमेदवारी मागे घेणे. त्यानंतर उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. उपाध्यक्ष निवडणुकीनंतर नामनिर्देशित सदस्यांची नियुक्तीची घोषणा करण्यात येईल.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– जागा काही मिळेना अन् कचऱ्याची समस्या काही सुटेना ! टाकवे बुद्रुक ग्रामस्थ कचऱ्याच्या समस्येने हैराण
– येलघोल-धनगव्हाण ग्रुप ग्रामपंचायतीच्या नूतन प्रशासकीय कार्यालयाचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते उद्घाटन
– …तर भाजपालाही उपनगराध्यक्षपद देईन ; वडगाव नगरपंचायतीत भाजपाचा उपनगराध्यक्ष करण्याबाबत आमदार सुनील शेळके सकारात्मक


