Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी मंगळवार, दि. २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने नगरपरिषद प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून ६४,६७९ मतदार असलेल्या एकूण १४ प्रभागासाठी ७१ केंद्र निश्चित करण्यात आलेली आहे.
मतदानाच्या दिवशी एकूण ३४९ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून सदर अधिकारी व कर्मचारी यांना आतापर्यंत ३ वेळा प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रथम प्रशिक्षण दि. १६ नोव्हेंबर, द्वितीय प्रशिक्षण दि. २४ नोव्हेंबर आणि तृतीय प्रशिक्षण दि. २९ नोव्हेंबर रोजी घेण्यात आले.
सदर अधिकारी व कर्मचारी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मतदानासाठी आवश्यक ते मतदान साहित्य नवीन प्रशासकीय कार्यालय येथे घेऊन केंद्रांवर रवाना होणार असून दि. २ डिसेंबरला मतदान संपल्यानंतर सांय. ६ वाजता त्यांचे साहित्य स्वीकृत करण्यात येणार आहे. मतदानासाठी ७१ इव्हीएम मशीन दि. २८ नोव्हेंबर रोजी उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधी यांचे समक्ष सिलिंग करून तयार ठेवण्यात आल्या आहेत.
मतमोजणीची व्यवस्था दि. ३ डिसेंबर रोजी नवीन प्रशासकीय कार्यालय येथे तळमजल्यावर करण्यात आली असून. मतमोजणीची सुरुवात सकाळी १० वाजता होणार आहे. मतमोजणी करीता २ नोडल अधिकारी, १४ झोनल अधिकारी यासह २८ मतमोजणी सहाय्यक पर्यवेक्षक आहेत तसेच मदतीकरिता नगरपरिषदेचे ६० अधिकारी आणि कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
चोख पोलीस बंदोबस्त :
तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूकीकरिता पोलीस प्रशासनाकडून अपेक्षित प्रमाणात पोलीस दल उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये १ पोलीस उपायुक्त, १ सहाय्यक पोलीस आयुक्त, ६ पोलीस निरीक्षक, १४ सहाय्यक पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक, ३५० पोलीस अंमलदार तसेच ८८ होम गार्ड नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाची १ प्लाटून आणि २ दंगल नियंत्रण पथक सुद्धा तैनात असणार आहे. प्रचाराचा कालावधी दि. १ डिसेंबरला रात्री १० वाजेपर्यंत असून त्यानंतर कोणत्याही प्रकारचा प्रचार, सभा, पदयात्रा तसेच ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना तांबे यांनी दिली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेत होणार ; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल
– मोठी बातमी ! घरफोडीतील आरोपींचा पोलिसांवर गोळीबार ; सोमाटणे फाटा येथे पाठलाग सुरू असतानाचा थरार, आरोपी जेरबंद
– Lonavala Election : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने लोणावळ्यात घेतलेल्या ‘त्या’ एका निर्णयाचे राज्यभर होतंय कौतुक, विरोधकांनीही मानलं…

