Dainik Maval News : वीकेंड आणि वीकेंडला जोडून आलेला थर्टी फर्स्ट, नवीन वर्षाचा पहिला दिवस… असा प्रदीर्घ सुटीचा योग साधून मौज मजा करण्यासाठी मावळात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. परंतु मोठ्या संख्येने पर्यटकांची गर्दी पर्यटनस्थलांवर होत असल्याने ग्रामीण भागातील लहान मोठ्या चौकांत वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. ही वाहतूक कोंडी मिटविण्यासाठी स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस काम करताना दिसत आहेत.
मोठ्या संथ्येने येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमुळे मुख्य रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. स्थानिक नागरिकांना देखील या वाहतूक कोंडीचा चांगलाच फटका बसत आहे. स्थानिक नागरिक, दुग्ध व्यवसायिक, कामगार यांना यामुळे दैनंदिन कामे करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर पर्यटनासाठी आलेले पर्यटकही तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडत आहेत.
पर्यटकांच्या वाहनांमुळे तालुक्यातील मुख्य रस्ते, सोबत अंतर्गत रस्त्यांवरही वाहतूक कोंडी होत आहे. लोणावळा शहर, लोणावळा ग्रामीण, कामशेत मावळ, वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे व शिरगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस यंत्रणांवर यामुळे प्रचंड ताण आलेला आहे. लोणावळा, खंडाळा, कार्ला, पवनानगर याशिवाय आंदर मावळातील काही पर्यटनस्थळी पर्यटक गर्दी करीत आहेत.
गडकिल्ले, लेणी तसेच धार्मिक स्थळी पर्यटक जात आहेत. घोरवडेश्वर, शिरगाव, शिर्डी, दुधीवरे, कार्ला येथील एकवीरा देवी तसेच भाजे आदी ठिकाणच्या धार्मिक स्थळी पर्यटक भाविकांची मोठी गर्दी होत आहे. यामुळे रस्त्यावर आलेल्या चारचाकी वाहनांच्या संख्येत भर पडली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने सोमवारी 30 डिसेंबर रोजी वाहतूक मार्गात मोठा बदल – जाणून घ्या
– थर्टी फर्स्ट, नववर्षाच्या स्वागतासाठी पवना धरण परिसरात येण्याचा प्लॅन करताय ? आधी ही बातमी वाचा । Pavana Nagar News
– विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त पुणे जिल्ह्यातील वाहतुकीत मोठा बदल ; पाहा कोणते मार्ग बंद, कोणते सुरु