Dainik Maval News : संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनद्वारा जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत लोणावळा आणि खंडाळ्यात स्वच्छता, वृक्षारोपण अभियान करत स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यात आला.
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानामुळे पर्यावरणावर संकट निर्माण होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर मिशनच्या वतीने देशातील सात राज्यांमधील १४ पर्वतीय स्थळांवर स्वच्छता अभियान राबविण्यात आले, यामध्ये महाराष्ट्रातील लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, पाचगणी, पन्हाळ्यासह शिमला, मसुरी, नैनीताल, नंदी हिल्स, लैंसडौन, सापुतारा, माऊंट अबू, गंगटोक आदी पर्यटन स्थळांचा समावेश आहे.
गुरुवारी (दि. ५ जून) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास संत निरंकारी मिशनचे सुमारे दोन हजार अनुयायी तसेच स्वयंस्फूर्तीने सेवा करणारे सदस्य स्वच्छता अभियानात सहभागी झाले. पृथ्वीवर सध्या ग्लोबल वॉर्मिंगसह प्लास्टिक कचऱ्याचे संकट आहे. अशावेळी पर्यावरण संकटाविषयी नागरिकांना जागृत होण्याची प्रेरणा देण्याचा संत निरंकारी मिशनचा प्रयत्न आहे.
पुणे झोन माध्यमातून लोणावळा, खंडाळा येथील मुंबई-पुणे महामार्गाचे दोन्ही बाजूचे रस्ते, खंडाळा ते अमृतांजन पॉइंट, वलवन तलाव, कावेरी फार्म, नांगरगाव, लोहगड उद्यान, रायवूड ते लोणावळा डॅम गेट, आयएनएस शिवाजी ते भुशी, तुंगार्ली चौक ते ग्रामीण पोलिस ठाणे, नगरपरिषद कार्यालय, मावळा पुतळा आदी ठिकाणी स्वयंसेवक व सेवादलाच्या वतीने संपूर्ण परिसर स्वच्छ केला.
लोणावळा परिसरात वृक्षारोपण करत मिशनच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता अभियान राबवीत स्वच्छतेचा संदेश दिला. पथनाट्य, पोस्टर्स तसेच मानवी साखळीच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्तीचा संदेश देत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहूनगरीत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची लगबग सुरू ! वारकऱ्यांची सुरक्षा, सोयीसुविधांबाबत आढावा बैठक संपन्न । Dehu News
– सोमवारपासून लोणावळ्यातील भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू करा ! जिल्हाधिकाऱ्यांचा ‘ऑन द स्पॉट’ निर्णय । Lonavala News
– ‘एमएसआरडीसी’कडून पुणे-मुंबई महामार्गावर अपघातप्रवण क्षेत्रात उपाययोजना ; वडगाव फाटा, कामशेत घाट, शिलाटणे फाटा भागाचा समावेश