Dainik Maval News : वडगाव शहराच्या माजी उपनगराध्यक्षा, मनसे नेत्या सायली म्हाळसकर यांच्या नेतृत्वाखाली वडगाव शहरात जनसंवाद यात्रा उपक्रम राबविण्यात आला होता. 52 दिवसांत 17 प्रभागांतील 7 हजार 500 कुटुंबांना भेटी देऊन सुमारे 25 हजार नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. यादरम्यान नागरिकांनी मांडलेल्या समस्या आणि तक्रारींची माहिती देण्यासाठी बुधवारी (दि. 21 मे) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना, “वडगाव नगरपंचायत क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत विकासकामे केल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. पण, तो फसवा असून नागरिकांना आजही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे,” असा आरोप मनसेचे माजी तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांनी केला. या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असून गरज पडल्याने आंदोलन करणार असल्याचेही म्हाळसकर यांनी सांगितले.
पत्रकार परिषद प्रसंगी मनसेचे माजी तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांसह सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर वाघमारे, तानाजी तोडकर, संतोष म्हाळसकर, सुहास इंदलकर, मच्छिंद्र मोहिते आदी उपस्थित होते.
- रुपेश म्हाळसकर म्हणाले की, “नागरिकांनी सर्वांत जास्त तक्रारी अपुऱ्या पाणी पुरवठ्याबाबत केल्या. शहरातील एकमेव जलशुद्धीकरण प्रकल्प मोडकळीस आला आहे. पाच वर्षांत नागरिकांना शुद्ध व पुरेसे पाणी मिळाले नाही. गृह प्रकल्पांचे सांडपाणी नदीमध्ये जात आहे. कचरा डेपोसाठी रस्ता नसलेली जागा खरेदी करण्यात आली. तिचाही वापर होत नाही. त्याची चौकशी होण्याची गरज आहे. पाच वर्षांत एकही घरकुल योजना राबवली नाही. गुन्हेगारी वाढली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना अपुऱ्या आहेत. युवा पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात आहे. आठवडे बाजार तळ्याकाठी अपुऱ्या जागेत भरतो. शहराला प्रशस्त भाजी मंडईची गरज आहे. तालुक्याचे गाव असूनही सार्वजनिक आरोग्य सुविधा नाही. येथे नगरपंचायतीचे सुसज्ज व अद्ययावत हॉस्पिटल होण्याची गरज आहे.” आदि समस्या मांडत शहरातील समस्या सोडविण्यासाठी नगरपंचायतीकडे पाठपुरावा करण्यात येईल आणि गरज पडल्यास आंदोलन करणार, असेही म्हाळसकर यांनी सांगितले.
कर आकारणी चुकीची – वाघमारे
वडगाव नगर पंचायतीने केलेल्या चुकीच्या कर आकारणीबाबत यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर वाघमारे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, “शहरातील मालमत्तांच्या सर्व्हेसाठी नगरपंचायतीने नेमलेल्या एजन्सीने चुकीचा सर्व्हे केला, तसेच मालमत्तांचे चुकीचे मोजमाप केले. त्यामुळे भरमसाठ कर आकारणी झाली. त्यावर 771 नागरिकांनी हरकती दाखल केल्या. त्यांची सुनावणी झाली, परंतु निर्णय दिला नाही.”
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– खरीप हंगाम तोंडावर, कृषी सहाय्यक संपावर ! बळीराजा आणि कृषी विभागातील संपर्क तुटला । Maval News
– तळेगाव आगारातून सुटणारी तळेगाव दाभाडे ते विलेपार्ले बस पुन्हा सुरू करण्याची मागणी । Talegaon Dabhade
– खादी ग्रामोद्योग संघ मावळ तालुक्यात ‘पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान’ योजना प्रभावीपणे राबविणार । Maval News
– जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांकडून एकाला बेदम मारहाण ; आंबळे गावातील घटना । Maval News