Dainik Maval News : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातील कृषी सहाय्यक म्हणजे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बांधावर जाऊन मार्गदर्शन करणारा कर्मचारी, परंतु गेली काही दिवसांपासून राज्यभरातील कृषी सहाय्यक त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. यामुळे ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी कृषी विभागाच्या मार्गदर्शनापासून वंचित राहिले आहेत.
मावळ तालुका हा खरीप भात पिकासाठी प्रसिद्ध आहे. मावळातील शेतकरी सध्या खरिपाच्या तयारीत गुंतले आहेत. अशात शेतकऱ्यांना खरीप बियाणे, बिजप्रक्रिया, भात लागवड तसेच फळबाग लागवड इत्यादी बाबत मार्गदर्शनाची गरज आहे. परंतु कृषी सहाय्यक संपावर असल्याने त्यांना हे मार्गदर्शन मिळत नसून याचा फटका पीक उत्पादनावर बसण्याची शक्यता आहे.
कृषी सहाय्यकांच्या प्रमुख मागण्या –
कृषी सेवक तीन वर्षांचा कालावधी रद्द करणे, ऑनलाइन कामे करण्यासाठी लॅपटॉप मिळावा, कृषी सहाय्यक पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करणे, ग्रामस्तरावर मदतनीस मिळणे, निविष्टा वाटपाचे मार्गदर्शक सूचनानुसार कार्यवाही व्हावी, नैसर्गिक आपत्ती पंचनाम्याची कार्यपद्धती तयार करण्यात यावी, आकृतिबंध तात्काळ मंजूर करण्यात, या कृषी सहाय्यकांच्या मागण्या असल्याचे कृषी सहाय्यक विकास गोसावी यांनी सांगितले.
मावळ तालुक्यातील तयार झालेले बियाणे शेतकऱ्यांना मिळू शकले नाही, बियाणे कधी आले आणि कधी संपले कळले सुद्धा नाही. कृषी सहायक अधिकारी संपावर असल्याने शेतकऱ्यांना कसलेही मार्गदर्शन मिळत नाही. – दत्तात्रय साळूंके, प्रगतशील शेतकरी, कुसगाव पमा
खरीप हंगाम शेतकऱ्याच्या दुरुष्टीने महत्वाचा असून सध्या गावामध्ये कसल्या ही प्रकारचे कृषी विभागाचे मार्गदर्शन मिळत नाही. भात लागवड, फळबाग, खते बियाणे बाबत शेतकरी वंचित आहेत. – अशोक थोरवे, प्रगतशील शेतकरी, साळूंब्रे
कृषी विभागातील गावातील शेतकऱ्यासाठी काम करणारा घटक कृषी सहाय्यक आहे. सध्या स्थितीला सगळं काम ऑनलाइन होत आहे. देश डिजिटल होतोय मग शेतकऱ्यासाठी काम करणाऱ्याना लॅपटॉप देणे सरकारला बंधन कारक आहे. बाकी सर्व विभागात सुविधा दिल्या जातात, मग कृषी विभागाला द्यायला काय अडचण आहे. सरकारला विनंती आहे की, तत्काळ कृषी सहाय्यकांच्या मागण्या मंजूर कराव्यात. – प्रदीप देशपांडे, मळवंडी ठुले
कृषी विभागातील क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या कृषी सहाय्यकांशिवाय शेतकऱ्यांना कसले ही मार्गदर्शन मिळणार नाही. खरीप हंगामातील भात हे मावळ तालुक्यातील शेतकऱ्याचे मुख्य पीक आहे. त्यामुळे मार्गदर्शनाची शेतकऱ्यांना गरज आहे. कृषी सहाय्यकांना लॅपटॉप व मदतनीस तात्काळ द्यावेत. कृषि मित्रांना पुन्हा कामावर घ्यावे. – लहू धनवे, प्रगतशील शेतकरी, शिळींब
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे आगारात पाच नव्या एसटी बसगाड्यांचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते लोकार्पण । Talegaon Dabhade
– ‘स्थानिक’च्या इच्छुकांची धावपळ वाढली ; गाठीभेटी आणि लग्नसोहळ्यातून जनसंपर्क वाढविण्यावर भर
– मोठी बातमी : प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करा ; निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश