Dainik Maval News : प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पासंदर्भात बौर आणि ब्राह्मणवाडी येथील ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. श्री लक्ष्मी नारायण मंदिर, ब्राह्मणवाडी येथे झालेल्या या बैठकीत ग्रामस्थांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
ग्रामस्थांच्या मते, एमआयडीसीसाठी प्रस्तावित क्षेत्रातील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता तसेच त्यांच्याशी कोणतीही सविस्तर चर्चा न करता शासनाकडून पुढील प्रक्रिया राबविली जात आहे. याबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
बैठकीत जिल्हाधिकारी पुणे यांच्यासोबत सुमारे १५ दिवसांपूर्वी झालेल्या चर्चेचाही उल्लेख करण्यात आला. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसांत पुढील माहिती देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर एका एकर जमिनीसाठी ८४ लाख रुपयांचा मोबदला देण्याचा प्रस्ताव समोर आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
मात्र, उपस्थित ग्रामस्थांनी हा मोबदला अपुरा असल्याचे स्पष्ट करत अशा अटींवर जमीन देण्यास नकार दर्शविला. शेती ही केवळ मालमत्ता नसून ती शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले. तसेच मिळणाऱ्या मोबदल्यातून पर्यायी शेती किंवा व्यवसाय उभारणे शक्य नसल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला.
याशिवाय गावातील घरे, स्मशानभूमी, मंदिरे, शाळा आणि इतर सामाजिक सुविधांच्या मोबदल्याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच ‘लँड फॉर लँड’ अर्थात जमिनीच्या बदल्यात जमीन देण्याच्या पर्यायावरही अद्याप कोणतीही ठोस चर्चा झालेली नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
ग्रामस्थांनी बैठकीत स्पष्ट भूमिका घेत सांगितले की, सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन, प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा करून आणि समाधानकारक मोबदल्याबाबत निर्णय झाल्याशिवाय प्रकल्पासाठी एक इंचही जमीन दिली जाणार नाही.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पंचायत समिती शिक्षण विभाग आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मावळ तालुका यांच्यावतीने दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
– पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना
– भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी
– जनगणनेच्या कामासाठी जात असताना शिक्षिकेचा रस्ते अपघातात मृत्यू ; मावळमधील हृदयद्रावक घटना