Dainik Maval News : मावळ तालुक्यातील आर्डव गावात स्मशानभूमी नसल्यामुळे एका मृत व्यक्तीवर भर पावसात उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. मुसळधार पाऊस सुरू असताना नातेवाईक आणि ग्रामस्थ छत्र्यांचा आधार घेत अंत्यविधी पार पाडत असल्याचे हृदय हेलावून टाकणारे दृश्य पाहायला मिळाले. पावसामुळे चिता पेटविण्यासही अडचणी निर्माण झाल्या. अशा परिस्थितीत अंत्यसंस्कार करणे हे मृताच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत वेदनादायी ठरले.
भारतात स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे पूर्ण झाली असली तरी ग्रामीण भागातील काही गावांमध्ये स्मशानभूमीसारखी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध नसणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. शासनाच्या विविध योजनांतून गावागावांत विकासकामे होत असताना आर्डव गावातील हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावात स्मशानभूमीसाठी जागा निश्चित नसल्याने प्रत्येक वेळी उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात. विशेषतः पावसाळ्यात मृत्यू झाल्यास चिखल, पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे अंत्यविधी करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनाही अशा वेळी मोठा त्रास सहन करावा लागतो.
गावातील नागरिकांनी अनेकदा संबंधित प्रशासन, ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींकडे स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली असल्याचे सांगितले. मात्र अद्यापही हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. जागेचा वाद, प्रशासकीय दिरंगाई किंवा अन्य कारणांमुळे गावकऱ्यांना मूलभूत सुविधेपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
मावळ तालुक्यात मोठमोठे विकास प्रकल्प राबविले जात असताना ग्रामीण भागातील अशा मूलभूत प्रश्नांकडेही तितक्याच गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. “जिवंतपणी सुविधा मिळाल्या नाहीत, पण निदान मृत्यूनंतर तरी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था असावी,” अशी हळहळ ग्रामस्थांनी व्यक्त केली.
आर्डव गावासाठी तातडीने स्वतंत्र स्मशानभूमी मंजूर करून आवश्यक जागा उपलब्ध करून द्यावी, अंतर्गत रस्ता, शेड, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत सुविधा आणि अंत्यसंस्कारासाठी आवश्यक मूलभूत सुविधा उभाराव्यात, तसेच जागेचा वाद असल्यास तो तातडीने निकाली काढावा, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे केली आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन
– शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन
– मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)
