Dainik Maval News : वडगाव मावळ येथील श्री महावीर आनंद भवन या जैन समाजाच्या पवित्र धार्मिक स्थळावर विकास आराखड्यात (DP) आठवडे बाजाराचे आरक्षण टाकण्यात आले असून, हे आरक्षण तात्काळ हटवावे, अशी मागणी जैन स्थानकवासी श्रावक संघ, वडगाव मावळ यांच्यावतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रविण निकम यांना निवेदन देत आपल्या भावना मांडल्या. पूर्वीच्या विकास आराखड्यात सदर वास्तूवर कोणतेही आरक्षण नव्हते, मात्र नव्याने तयार केलेल्या आराखड्यात CTS क्र. ६ या धार्मिक स्थळावर आठवडे बाजारासाठी आरक्षण दर्शविण्यात आले आहे. यामुळे जैन धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याची भावना या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
श्री महावीर आनंद भवन हे जैन साधू-संतांच्या मुक्कामासाठी, चातुर्मासासाठी आणि धार्मिक विधीसाठी वापरले जाणारे स्थळ असून, येथे दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असतात. कोरोना काळातही या ठिकाणी हजारो गरजूंसाठी नगरपंचायतीच्या सहकार्याने स्वयंपाकघर चालवले गेले होते, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यासाठी पर्यायी ठिकाणाची (रेल्वे लगत तलाव परिसरातील मोकळी जागा) सुचना करत, धार्मिक स्थळावर आरक्षण न ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच ही मागणी न मानल्यास जैन समाजाच्या वतीने लाक्षणिक उपोषण, शांततामार्गी मोर्चा व कायदेशीर आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.
या निवेदनावर संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्र मुथा, राजेश बाफना, अशोकलाल गुजराणी, झुंबरलाल कर्नावट, सनी सुराणा, आनंद बाफना, अनिल बाफना, सुरेंद्र बाफना, दिलीप मुथा, भूषण मुथा, अमोल बाफना, अमित मुथा, रोहन मुथा यांच्यासह अनेक जैन बांधवांच्या सह्या आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पावसाळ्यात फिरायला जायचंय? पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका म्हणजे पावसाळ्यात स्वर्गच, ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या
– महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती ! २० हजार ७८७ कोटींची तरतूद ; बारा जिल्ह्यांना जोडणारा ८०२ कि.मी. लांबीचा द्रुतगती मार्ग
– मावळ लोकसभा क्षेत्रातील पनवेल विमानतळ सप्टेंबरपासून सुरू होणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती
– कार्यकर्ते हेच आमचे खरे बलस्थान, पुढील प्रत्येक निर्णय त्यांच्याच सल्ल्याने घेणार – आमदार सुनील शेळके