Dainik Maval News : आमदार सुनील शेळके यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मावळातील डान्स बार तातडीने बंद करावेत, याबाबत मुद्दा उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर वडगाव मावळ पोलिसांनी कठोर भूमिका घेत पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या ऑर्केस्ट्रा बारवर धडक कारवाई केली.
वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कान्हे फाटा व साते परिसरातील “गोल्डन ड्रीम ऑर्केस्ट्रा बार” आणि “विश्वदीप (फ्लेवर्स) ऑर्केस्ट्रा बार” येथे पोलिसांनी छापे टाकून कारवाई केली. दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी वडगाव मावळ पोलिसांनी दोन स्वतंत्र पथके तयार करून कान्हे येथील गोल्डन ड्रीम ऑर्केस्ट्रा बार येथे छापा टाकला.
तपासादरम्यान शासनाने दिलेल्या परवान्याच्या अटी व शर्तींचा गंभीर भंग झाल्याचे आढळून आले. या प्रकरणी उदय चक्का सालियन (वय 49, रा. गोल्डन ड्रीम ऑर्केस्ट्रा बार, कान्हे, ता. मावळ), दिनेश कृष्णा शेट्टी (वय 46, मुळ रा. ठाणे, सध्या रा. कान्हे, ता. मावळ) आणि किर्तन के. सी. टी. (वय 27, रा. गोल्डन ड्रीम ऑर्केस्ट्रा बार, कान्हे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑर्केस्ट्रा रंगमंचावर केवळ ८ कलाकारांची मर्यादा असताना ११ महिला कलाकारांना मंचावर ठेवण्यात आले, कलाकारांनी दर्शनी भागावर ओळखपत्र परिधान केले नव्हते, तसेच नियमांपेक्षा मोठा रंगमंच उभारण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले.
साते (ता. मावळ) येथील विश्वदीप ऑर्केस्ट्रा बार येथेही परवाना अटींचा भंग झाल्याचे आढळून आले. या प्रकरणी बारचे प्रोप्रायटर व चालक मनिष सुवर्ण कुमार (वय 62, रा. साते, ता. मावळ, जि. पुणे) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. येथेही रंगमंचावर ठराविक मर्यादेपेक्षा अधिक कलाकार, ओळखपत्रांचा अभाव व नियमबाह्य रंगमंच आढळून आला.
डान्सबार कारवाईच्या या दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींविरोधात महाराष्ट्र हॉटेल, उपहारगृहे व मद्यपानगृहे (बार रूम) मधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध व महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण अधिनियम 2016 चे कलम 8(1) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्ये यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी ही माहिती दिली असून, पुढील तपास स्वतः पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख करीत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंमलबजावणीस मंत्रिमंडळाची मंजुरी
– मावळ तालुक्यातील मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरणी विद्यमान तहसीलदार सहीत 11 महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन
– 2028 पर्यंत पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम पूर्ण होणार ; रिंग रोड सह विविध रस्ते, मेट्रो प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर
– मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरण : नक्की काय कारवाई होणार? पाहा महसूलमंत्री बावनकुळे काय म्हणाले
