Dainik Maval News : लोणावळा नगर परिषदेच्या वरसोली येथील कचरा डेपोला अचानक आग लागल्याने परिसरातील रहिवासी हैराण झाले आहेत. या आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट उसळले असून, परिसरात राहणाऱ्या नागरिकांना या धुराचा आणि दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
वरसोली कचरा डेपोला लागूनच मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाका आहे. तसेच शेजारील वरसोली, वाकसई चाळ, वाकसई, सदापूर आणि डोंगरगाव या गावांमध्येही धुराचा मोठा प्रभाव जाणवत आहे. नागरिकांना या धुरामुळे श्वसनाचा त्रास होण्यासह आरोग्यविषयक इतर समस्यांचा सामना करावा लागत आहे. सोबतच, कचरा डेपोमधून आधीच येणाऱ्या दुर्गंधीने त्रस्त असलेल्या नागरिकांची अवस्था आता आणखीनच बिकट झाली आहे.
- लोणावळा नगर परिषदेने मागील पाच ते सहा वर्षांपासून या ठिकाणी बायोमायनिंगच्या माध्यमातून जुना कचरा प्रक्रिया करून हटवण्याचे काम ठेकेदारी पद्धतीने सुरू केले आहे. मात्र प्रत्यक्षात हे काम योग्य पद्धतीने होत नसल्याने परिस्थिती जसंच्या तशी राहिली आहे. परिणामी, नागरिकांना सतत त्रास सहन करावा लागत आहे.
आगीमुळे वाढलेल्या त्रासामुळे स्थानिक नागरिक आता संतप्त झाले आहेत. त्यांनी लोणावळा नगर परिषदेला तातडीने ही आग विझवण्याची आणि कचऱ्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया करून निष्कासनाची मागणी केली आहे. तसेच, प्रशासनाने त्वरित उपाययोजना न केल्यास कचरा डेपोला टाळे ठोकून आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन कार्यालयाचे बांधकाम पूर्ण ; लवकरच भव्य सोहळ्यासह होणार लोकार्पण
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन
– पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत मावळातील सात मल्लांनी पटकाविली पदके ; तीन पैलवानांची ‘महाराष्ट्र केसरी’साठी निवड