मराठी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे आज बुधवार (11 जानेवारी) रोजी निधन झाले. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक महिन्यांपासून त्यांची तब्येत बिघडलेली होती. त्यांच्यावर मुलुंडच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे दुःखद निधन झाले. ऑनस्क्रीन आजीबाई अशी ओळख राहिलेल्या चित्रा नवाथे यांच्या उतारवयातील संघर्ष मात्र कुणाच्याही डोळ्यात पाणी आणेल असाच होता.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
चित्रा नवाथे यांचे खरे नाव कुसुम असे होते. सिनेक्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर त्यांनी त्यांचे नाव चित्रा असे केले. त्यांनी त्यांच्या बहिणीबरोबरच अभिनय क्षेत्रात पहिले पाऊल ठेवले. कुसूम आणि कुमूद या दोन बहिणींनी 1952 साली प्रदर्शित झालेल्या ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र अभिनय केला होता. त्यानंतर मात्र चित्रा यांची अभिनयाची गाडी धावतच राहिली. त्यांनी टींग्या, पोरबाजार, बोक्या सातबंडे अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले. अगडबंम आणि अगं बाई अरेच्चा या चित्रपटातील त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या.
बहुतांश चित्रपटात त्यांची आजीची भुमिका साकारलेली प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मात्र स्क्रीनवर सर्वांची लाडकी असणारी ही आजी उतारवयात मात्र त्यांच्या जवळील लोकांना नकोशी झाली होती. त्यांचे आजारपण जवळील व्यक्तींना कटकटीचे वाटू लागले होते. त्यामुळेच त्यांची सेवा करण्यासाठी कुटुंबीय किंवा नातेवाईक असे कुणीही पुढे येत नव्हते. अखेरीस त्यांनी स्वतः उतारवयात वृद्धाश्रमाचा पर्याय निवडला होता. चित्रा नवाथे यांच्यावर बुधवारीच सांताक्रुझ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
अधिक वाचा –
– ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचा 29 वा वर्धापन दिन तळेगाव दाभाडे येथे उत्साहात साजरा
– मावळात हे काय सुरूये? तळेगाव दाभाडेत भरदिवसा व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा, बंदुकीचा धाक दाखवून 10 लाख लंपास
– मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, स्विकृत नगरसेवकांची संख्या वाढवली, वाचा मंत्रिमंडळ निर्णय