Dainik Maval News : राज्य निवडणूक आयोगाने दिनांक २९ नोव्हेंबर रोजीच्या पत्रान्वये, नगरपरिषदा व नगरपंचायतीमध्ये ज्या जागेसाठी अपील दाखल होते, परंतु अपीलाचा निकाल संबंधित जिल्हा न्यायालयाकडून दिनांक २२ नोव्हेंबर म्हणजेच दिनांक २३ नोव्हेंबर किंवा तद्नंतर देण्यात आलेला आहे, अशा नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या सदस्य पदाच्या त्या जागेच्या निवडणूका दि. ४ नोव्हेंबर रोजीच्या कार्यक्रमानुसार घेण्यात येवू नयेत. तसेच अशा प्रकरणात अध्यक्ष पदाचा समावेश असल्यास त्या संपूर्ण नगरपरिषदेची निवडणूक स्थगित करण्यात आली असल्याचे व सदर ठिकाणच्या निवडणूकांसाठी आदेशासोबत जोडलेल्या परिशिष्ट – १ मध्ये दर्शविलेल्या सुधारीत वेळापत्रकानुसार निवडणूकीचा कार्यक्रम राबवावा असे कळविले आहे.
त्याअनुषंगाने, पुणे जिल्ह्यातील बारामती व फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने अध्यक्ष पदासंदर्भात जिल्हा न्यायालयात अपील दाखल झाले होते. आयोगाच्या निर्देशानुसार सदर अपीलावर दिनांक २२ नोव्हेंबर रोजी पर्यंत न्यायालयाचा निकाल पारीत होणे आवश्यक होते. तथापि, उक्त नमुद नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या अपीलावर न्यायालयाने दि. २६ नोव्हेंबर रोजी निकाल पारीत केलेला आहे. तसेच बारामती नगरपरिषदेच्या जागा क्र. २ (अ), ८ (ब), ११ (ब), १३ (ब), १५ (ब). १७ (अ)) व १९ (ब) साठीचे न्यायालयाचे निकाल देखील २२ नोव्हेंबर रोजी नंतर लागलेले आहेत व फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदेच्या जागा क्र. १३ (ब) करीता निकाल २२ नोव्हेंबर रोजी नंतरच पारित करण्यात आला आहे.
आयोगाच्या दि. २९ नोव्हेंबर रोजीच्या आदेशात नमूद केल्यानुसार सदर दोन्ही नगरपरिषदांच्या अध्यक्ष पदाचा समावेश असल्याने त्या बारामती व फुरसुंगी उरुळी देवाची या दोन्ही संपूर्ण नगरपरिषदेची निवडणूक स्थगित करण्यात येत असून बारामती व फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी व सदस्यपदांसाठीची सार्वत्रिक निवडणूक, २०२५ चे मतदान दि.२० डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.
तसेच तळेगाव दाभाडे, लोणावळा, दौंड व सासवड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने सदस्य पदासंदर्भात देखील जिल्हा न्यायालयात अपील दाखल झाले होते. सदर अपीलावर देखील न्यायालयाने दि. २२ नोव्हेंबर नंतर निकाल पारीत केलेला असल्यामुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या जागा क्र. २ (अ), ७ (अ), ७ (ब), ८ (अ), ८ (ब) व १० (ब), लोणावळा नगरपरिषदेच्या जागा क्र. ५ (ब) व १० (अ) व दौंड नगरपरिषदेच्या जागा क्र. ९ (अ) व सासवड नगरपरिषदेच्या जागा क्र. ११ (अ) या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी देखील आता दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
वर नमुद नगरपरिषदांसाठी अध्यक्ष व सदस्य पदासाठी नव्याने कोणत्याही उमेदवारास नामनिर्देशन दाखल करता येणार नाही. फक्त ज्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्र मागे घ्यावयाचे असल्यास, नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यत आहे.
बारामती व फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासहित सर्व सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसेच, तळेगाव दाभाडे, लोणावळा व दौंड नगरपरिषदेच्या उक्त नमुद जागेच्या सदस्यपदाच्या निवडणूकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या सुधारीत वेळापत्रकानुसार निवडणूक कार्यक्रम स्वंतत्रपणे वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात येईल. तसेच, त्यास संबंधित क्षेत्रात यथोचित प्रसिध्दी देण्यात येईल याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी असे आवाहन जितेंद्र डूडी, जिल्हाधिकारी पुणे यांनी केले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण
– कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गटात दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांचा गावभेट दौरा उत्साहात सुरू
– कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गट : आशाताई वायकर यांचा शिलाटणे गावभेट दौरा उत्साहात
– मोठी बातमी ! महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेत होणार ; सुप्रीम कोर्टाचा निकाल


