Dainik Maval News : महाराष्ट्रात सध्या राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निकालाची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी (दि.15) मतदान झाले आणि आज (दि.16) सर्व ठिकाणची मतमोजणी संपन्न होत आहे. अद्याप निवडणुकीचे संपूर्ण निकाल जाहीर होणे बाकी असून चित्र स्पष्ट झालेले नाही. परंतु सायंकाळी पाच वाजेपर्यंत समोर आलेल्या आकड्यांमध्ये राज्यभर भारतीय जनता पार्टी पक्षाचाच डंका वाजताना दिसत आहे.
अशात एका गोष्टीची सध्या जोरदार चर्चा होत आहे, ती म्हणजे मनपा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधीच राज्यातील जिल्हा परिषद – पंचायत समितींच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. या परिस्थितीत आगामी या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीत देखील भाजपाचा हा विजयी सूर कायम पाहायला मिळणार का?
मावळमधील परिस्थिती –
मावळ तालुका हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला होता, परंतु 2019 आणि 2024 विधानसभा निवडणुकीमध्ये मावळातील भाजपाच्या या बालेकिल्ल्याला सलग दोनदा सुनील शेळके यांनी सुरंग लावला. तसेच 2019 नंतर प्रथमच झालेल्या नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत देखील आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा वरचष्मा पाहायला मिळाला. यानिमित्ताने आकडेवारीत का असेना पण सध्या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नंबर एकचा पक्ष असल्याचे दिसते. अशात क्रमांक दोन वर फेकलेला भारतीय जनता पार्टी पक्ष राज्यातील मनपा निवडणुकीत पक्षाने मिळविलेल्या अभूतपूर्व यशाचा सूर घेऊन काही चमत्कार करणार का, हे पाहावे लागेल.
जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुका
मावळात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाने स्वबळाचा नारा दिला असून पाचही जिल्हा परिषद गट आणि दहाही गणांत विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. दुसरीकडे भाजपाने देखील मित्रपक्षांना सोबत घेऊन जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्यायाने आमदार सुनील शेळके यांचा विजयरथ रोखण्याचा चंग बांधला आहे. त्यांच्या या प्रयत्नांना आता मिळालेल्या मनपा निवडणुकीतील यशाचा बुस्टर मिळणार का? हे मात्र निवडणूकअंतीच दिसून येईल.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मावळ पंचायत समिती निवडणूक २०२६ : दहापैकी ‘या’ दोन गणातील उमेदवार असणार थेट सभापती पदाचा दावेदार – पाहा कुठल्या गणात कोणते आरक्षण
– मावळातील ‘या’ झेडपी गटाचा उमेदवार असेल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा दावेदार – पाहा मावळात कुठल्या गटात कोणते आरक्षण
– मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट, तर पंचायत समितीचे दहा गण – पाहा गट अन् गणनिहाय मतदारसंख्या ; काले गणात सर्वाधिक मतदार
– अखेर बिगुल वाजले ! राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा, ‘या’ 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांची होणार निवडणूक

