Dainik Maval News : चाकण-शिक्रापूर रस्त्यावर एका कंटेनर चालकाने बेदकारपणे वाहन चालवित जवळपास 10 ते 12 वाहनांना धडक दिली होती. 16 जानेवारी 2025 रोजी घडलेल्या या अपघातात जखमी झालेल्या एका लहान मुलीचा 23 जानेवारी रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर आता त्या मुलीच्या आईचा देखील उपचारादरम्यान मंगळवारी (दि.4) मृत्यू झाला. तब्बल 46 दिवस सुरू असलेली तिची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली.
पौर्णिमा अंबादास गाढवे (वय 29, रा. रासे, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर पिंपरीतील एक खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर पुढील उपचारांसाठी तिला सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
- उपचार सुरू असताना मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास पौर्णिमा यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे चाकण येथील कंटेनर अपघातातील मृतांची संख्या आता दोन झाली आहे. अपघातानंतर आठ दिवसांनी म्हणजे 23 जानेवारी रोजी पौर्णिमा यांची 9 वर्षीय मुलगी धनश्री अंबादास गाढवे हिचा पिंपरीतील खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. अपघातात जखमी पौर्णिमा यांची प्रकृती सुरुवातीपासून गंभीर होती. एकाच कुटुंबातील दोघींचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
आरोपी कंटेनरचालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत अनेक वाहनांना धडक दिली. तसेच, पोलिसांच्या गाडीलाही धडक देत पोलिसांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याशिवाय शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत देखील अपघातप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी कंटेनरचालकाला बेदम मारहाण केली होती. पुण्यात ससून रुग्णालयात त्याला दाखल केले होते. रुग्णालयातून सुटका होताच पोलिसांनी त्याला अटक केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अभ्यासिकेत अभ्यास केलेले चार विद्यार्थी बनले अधिकारी ; मुख्याधिकाऱ्यांनी केला सन्मान । Talegaon Dabhade
– देहू नगरपंचायतीला यात्रा अनुदान कधी मिळणार? नागरिकांच्या मिळकत करातून होतोय कोट्यवधीचा खर्च । Dehu News
– पिंपरी-चिंचवड शहरासाठी मुळशी धरणातील पाणी आरक्षणाची मागणी ; मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना निवेदन