Dainik Maval News : लोकसभा निवडणुकीत झालेली पिछेहाट लक्षात घेत महायुती सरकारने विधानसभा निवडणुक डोळ्यांसमोर ठेवून जुलै 2024 मध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. लगेचच ह्या योजनेसाठी अटीशर्ती जाहीर करून विशेष निधी मंजूर करून देत महिला लाभार्थींना लाभ द्यायलाही सुरुवात केली. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या योजनेमुळे राज्यातील महायुती सरकार पुन्हा सत्तेत आलं. परंतु आता नव्याने सत्तेत आलेल्या महायुती सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीत काही कठोरता अंगिकारली असून अपात्र लाभार्थी महिला वगळल्या जाणार आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारने जुलै महिन्यात राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेंतर्गत महिलांना प्रतिमाह 1500 रूपये दिले जाऊ लागले. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रूपयांचा हफ्ता देण्याची घोषणा देखील महायुतीच्या नेत्यांनी केली. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्दिष्टाने ही योजना लागू करण्यात आली होती. परंतु राज्य सरकारने आता या योजनेबाबत एक महत्त्वाची अट लागू केली आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिला राज्य सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना आता या योजनेचा लाभ घेता येणार नाही. या संदर्भात राज्य सरकारने आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे सध्या लाभ घेणाऱ्या 25 टक्के महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे दरमहा सरकारचे 900 कोटी रुपये वाचू शकतील, असेही सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आता इन्कम टॅक्स भरणाऱ्या कुटुंंबियांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यासोबतच पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे संबंधित महिलांनाच या संदर्भात निर्णय घ्यावा लागणार आहे.
याशिवाय संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांनाही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नसल्याची माहिती समोर येत आहे. या योजनेंतर्गत तब्बल 25 लाख महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे. तसेच नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या 84 लाख महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळवासियांना दिलासा द्यावा… वडगाव मावळ येथे कायमस्वरूपी उपविभागीय कार्यालय सुरू करण्याची मागणी
– आकारी पड जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर
– पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली, जितेंद्र डूडी नवे जिल्हाधिकारी म्हणून रुजू ; कोण आहेत जितेंद्र डूडी? जाणून घ्या