Dainik Maval News : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील मौजे मंगरूळ येथे गट क्रमांक 36, 37, 38 तसेच 35, 41, 42 आणि 46 या भागांत खाणपट्ट्यांच्या मर्यादेपेक्षा तब्बल ९० हजार ब्रास अधिक उत्खनन झाल्याचे ईटीएस सर्व्हेवरुन निदर्शनास आले आहे. याप्रकरणी विभागीय आयुक्तांमार्फत दुसऱ्यांदा चौकशी केल्यानंतर स्थानिक महसूल अधिकाऱ्यांनी जबाबदारी पार न पाडल्याचे उघड झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
यासंदर्भात विधानसभा सदस्य, मावळचे आमदार सुनील शेळके यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील मौजे मंगरूळ येथे उत्खननाची परवानगी 3 लाख 63 हजार ब्रास इतकी असतानाही 4 लाख 54 हजार ब्रास उत्खनन झाल्याचे आढळले.
यासंदर्भात, विभागीय आयुक्तांमार्फत नव्याने चौकशी केली असता, तपासात उत्खननाचे प्रमाण परवानगीपेक्षा अत्यंत जास्त असल्याचे आणि स्थानिक महसूल अधिकाऱ्यांनी जबाबदारी पार न पाडल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अवैध उत्खनन होत असताना जबाबदारी न निभावणाऱ्या संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदारावर तत्काळ निलंबन कारवाई जाहीर करण्यात आली. त्याचबरोबर, यासंदर्भात विभागीय आयुक्त यांनी दिलेला पहिल्या अहवालाची तपासणी मुख्य सचिवांमार्फत करण्यात येईल.
या निलंबन केलेल्या अधिकाऱ्यांवर तीन महिन्यांत विभागीय चौकशी पूर्ण केली जाणार असून चौकशी अहवाल पुढील अधिवेशनात पटलावर ठेवण्यात येईल, असे सांगून मंत्री बावनकुळे म्हणाले की, यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येऊन दंड व व्याजासह रक्कम वसूल करण्यात येईल. त्याचबरोबर, सातबारा नोंदीवर नोंद आणि दंड न भरल्यास सातबारा नोंदीवर कायमस्वरूपी नोंद राहणार राहणार आहे.
अवैध उत्खनन रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात ईटीएस सर्वे सुरू करण्यात येणार असल्याचे सांगून मंत्री बावनकुळे म्हणाले की, प्रत्येक जिल्हा, तालुका आणि गावात परवानगी व प्रत्यक्ष उत्खननाचा सविस्तर तुलनात्मक अहवाल तयार केला जाणार आहे. या लक्षवेधी सुचनेत सदस्य सुधीर मुनगंटीवार, बाबासाहेब देशमुख, समाधान आवताडे यांनीही उपप्रश्न विचारले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– लोणावळा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराची अखेरच्या दिवशी माघार
– लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिवेशनात मोठी घोषणा
– इंडिगो एअरलाईन्सच्या सेवा खंडीत होण्याचा मावळातील फूल उत्पादकांना फटका ; कोट्यवधीचे नुकसान
– नगराध्यक्षाचं जनता ठरवेल, पण उपनगराध्यक्षाचं बोला ! उमेदवारांकडून उपनगराध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावायला सुरूवात
