Dainik Maval News : ahmedabad plane crash : अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान गुरुवारी (दि. 12 जून) विमानतळाहून उड्डाण घेताच काही सेकंदाच कोसळले. या विमानात एकूण २४२ प्रवासी होते. त्यात विमानात दोन वैमानिक आणि १० केबिन क्रू सदस्यही होते. या विमान दुर्घटनेत विमानातील २४२ पैकी एक प्रवासी बचावला असून उर्वरित २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला असून यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे.
दुर्घटनेतील मृतांची संख्या २६५ वर
अहमदाबादमधील या भीषण विमान दुर्घटनेत विमानातील २२९ प्रवासी आणि १२ कर्मचारी मृत्युमुखी पडले आहेत. विमानातील प्रवाशांमध्ये १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश, १ कॅनेडियन व पोर्तुगालचे ७ नागरिक होते. केवळ एक प्रवासी या दुर्घटनेतून बचावला आहे. तसेच हे विमान मेघानीनगरमधील नागरी वस्तीत कोसळल्यामुळे काही रहिवाशांचा देखील या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या २६५ वर गेली आहे.
पंतप्रधान मोदींकडून प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (शुक्रवार, दि. 13 जून) सकाळीच अहमदाबादेत दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम दुर्घटनास्थळाची पाहणी केली. पंतप्रधानांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पाठोपाठ रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. यानंतर ते अहमदाबाद विमानतळावर जाऊन प्रशासकीय अधिकारी, विमानतळ प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.
अपघातपूर्वी वैमानिकाने दिला होता ‘मे डे’ संदेश
नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) दिलेल्या माहिती नुसार, ‘एआय १७१’ या बोइंग कंपनीच्या ड्रिमलायनर ७८७ विमानाने गुरुवारी दुपारी एक वाजून ३८ मिनिटांनी धावपट्टी क्रमांक २३ वरून उड्डाण घेतले. त्यानंतर काही मिनिटांतच या विमानाच्या वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रकाला ‘मे डे’ संदेश अर्थात विमान कोसळत असून मदतीची मागणी करणारा संदेश दिला. मात्र त्यानंतर काही क्षणातच विमानतळाजवळच्या परिसरातच हे विमान कोसळले आणि मोठा स्फोट होऊन आगीचे लोट आसमंतात उसळले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अहमदाबाद विमान दुर्घटना : विमानातील एक प्रवासी बचावला, उर्वरित सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती, मृतांमध्ये माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश । ahmedabad plane crash
– एकीवर दोघांचे प्रेम आणि सोळा वर्षीय मुलाची हत्या… देहूरोड हादरलं ! भेटायला बोलावलं आणि चाकूने भोकसलं । Dehu Road Crime
– आमदार सुनील शेळके यांच्या आदेशानंतर देहू नगरपंचायत प्रशासनाची तातडीने कारवाई ; रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविली । Dehu News